मिरे – स्वयंपाकघरातील तिखट द्रव्य

मिरे

काळे मिरे, black pepper स्वयंपाकातील एक महत्त्वाचा मसाला. भाज्या, सूप यांना तिखटपणा आणणारा मसाला. वेल्लज ( वेलीवर उगवणारे) कृष्ण ऊष्ण सुवृत्त पलित श्याम कोल कृष्ण यवनेष्ट वृत्तफल शाकांग ( भाजी करतांना वापरतात) कटुक ( तिखट चवीचे) अशी विविध नावे मरिच किंवा मिर्‍याकरीता आयुर्वेदात आली आहे.

मिऱ्याची वेल असते. फळ तयार झाल्यावर फलमंजिरी तोडून एक आठवडा उन्हात वाळवतात. चांगली फळे निवडून मिरे आपल्यापर्यंत पोहचतात.

मिरे चवीला तिखट तीक्ष्ण उष्ण असतात. मिरे आपण अनेक भाज्यामधे मसाला स्वरूपात वापरतो तसेच औषधी स्वरूपात त्याचे अनेक उपयोग आहेत.

  • आवाज बसला असेल तर मिरंपूड तूप चाटण घेतल्यास फायदा होतो.
  • कफ कमी करण्यात मिरे अतिशय उपयुक्त आहे. अनेक औषधी संयोगाने मिरे चूर्ण मधासह चाटण स्वरूपात देतात. त्रिकटू चूर्णात मिरे इतर दोन घटकद्रव्यांपैकी एक द्रव्य आहे जे कफ कमी करण्याकरीता प्रभावी कार्य करते.
  • मिरेपूड वाटून लावलेला लेप हा गरम आणि सूज कमी करणारा असतो. त्यामुळे रांजणवाडी, गळवे चामखीळ नायट्यावर याचा मिरे वाटून लेप किंवा तेलात मिसळून मिरेपूड लावल्याने त्वचा विकार कमी होतात.
  • दात किडणे दंतशूल यावर मिरेपूड पाण्यात घालून गुळण्या करणे किंवा मिरेपूड भरणे उपयोगी ठरते.
  • मिरे तिखट उष्ण असल्याने जीभ चिकट वाटणे किंवा अन्नाची चव न कळणे, पोट जड वाटणे अशा विविध पाचन तक्रारी दूर करतात.
  • थंडी वाजून येणाऱ्या तापेमधे मूगाचे कढण मिरेपूड घालून द्यावे. मिरे गरम असल्याने घाम आणून कफ ताप कमी करणारी आहे. शिवाय जिभेला चव येते. भूक लागते. शरीरातील सुस्ती अंग जड वाटणे अशा तक्रारी देखील दूर होतात.
  • कफयुक्त चिकट आव शौचास होत असेल तर ताकात मिरेपूड घालून घ्यावी.
  • स्वयंपाक घरातील मिरे तीक्ष्ण कफ कमी करणारे प्रमुख औषध आहे. यात बऱ्याच वेळा पपईचे बी किंवा इतर बियांची भेसळ केली जाते. पूड बनविल्यावर या बिया ठिसूळ दिसतात. मिऱ्यामधे उडनशील तेल असते.
  • त्रिकटू, मरिच्यादितेल तेल, श्वासकुठार, त्रिभुवनकिर्ती अशा अनेक औषधी कल्पांमधे मरिच वापरल्या जाते. पित्त प्रकृती, उष्णतेचे विकार पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी भाज्यांमधे मिरे जपूनच वापरावे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER