मीरा – भाईंदर महापालिकेत कर आकारणीचा घोटाळा

mira-bhayander-municipal-corporation

मीरारोड : कांदळवन , पाणथळ व सीआरझेड १ मधील अनधिकृत बांधकामांना कर आकारणी करू नये तसेच सरकारी जमिनी वरील अनधिकृत बांधकामाना शासकीय विभागाची नाहरकत घेऊनच कर आकारणी करावी असा निर्णय महापालिकेने २०१८ मध्ये घेतला . परंतु डिसेम्बर २०१९ च्या उपायुक्तांच्या आदेशाचा हवाला देऊन मोठ्या प्रमाणात कर आकारणी केली जात आहे . धक्कादायक बाब म्हणजे त्या उपायुक्तांची बदली मार्च २०१९ मध्येच झाली आहे . तब्बल १० महिन्यांनी त्यांच्या सहीने आदेश निघाला कसा ? असा प्रश्न आहे . तर स्वतः त्या उपायुक्तांनी देखील आदेशावरील स्वाक्षरी बाबत साशंकता व्यक्त करत बदली झाल्या नंतर इतक्या महिन्यांनी मी कसा आदेश काढू शकतो असा सवाल केला आहे . त्यामुळे पालिकेचा कर आकारणी घोटाळ्याचा भांडाफोड झाला आहे .

मीरा भाईंदर महापालिकेतील कर विभागाचा अनागोंदी कारभार नवीन नसून कर आकारणीचे घोटाळे सुद्धा अनेक आहेत . त्यातच अनधिकृत बांधकामे व झोपडपट्टयां भागातील अनधिकृत बांधकामे ह्यांना कर आकारणी साठी गैरप्रकार होत असतात . दलाल सुद्धा कर आकारणीच्या कामात सक्रिय असल्याचे आरोप आहेत . त्यामुळे खोट्या सही वा तारखेचा बनावट आदेश काढून मोठ्या प्रमाणात कांदळवन , पाणथळ, सीआरझेड १ तसेच सरकारी जमिनी वरील अनधिकृत बांधकामाना कर आकारणी करण्यात आली आहे असे हाती लागलेल्या कागदपत्रांवरून दिसून येत आहे . कर आकारणी साठी जोडलेले पुरावे देखील अपुरे व बोगस असण्याची शक्यता वर्तवली जात आहे . त्यामुळे ह्या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER