मिरा-भाईंदर महापौर निवडणुक : शिवसेनेने 5 मते फोडल्यानंतरही भाजप विजयी

Geeta Jain

भाईंदर : भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढाई झालेल्या मिरा भाईंदरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला मात देत भाजपच्या ज्योत्स्ना हसनाळे यांनी शिवसेनेचे अनंत शिर्के यांचा पराभव केला. भाजपच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेच्या पारड्यात मते टाकली तरीही भाजपने ही प्रतिष्ठेची लढाई जिंकली.

दिल्लीतील दंगलीमागे बाहेरच्या लोकांचा हात : केजरीवाल

माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने महापौर निवडणुकीच्या तोंडावर अचानक भाजपला रामराम केला. दुसरीकडे अपक्ष आमदार गीता जैन यांनीही भाजपपासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे मिरा भाईंदरमध्ये ऐनवेळी उलथापालथ होऊ शकते, असे दिसत असतानाही मात्र प्रत्यक्षात भाजपला फार मोठा फटका बसला नाही. महापौरपदी भाजपच्या ज्योत्स्ना हसनाळे यांनी तर उपमहापौरपदी भाजपचेच हसमुख गेहलोत यांनी विजय मिळवला.

९५ सदस्यीय पालिकेत ६१ नगरसेवकांसह भाजपकडे स्पष्ट बहुमत असून शिवसेनेचे २२ तर काँग्रेसचे १२ नगरसेवक आहेत. काँग्रेसने आजच्या निवडणुकीत शिवसेनेला साथ दिली. शिवाय भाजपच्या मोरस रॉड्रिक्स, अश्विन कसोदरिया, वैशाली रकवी, परशुराम म्हात्रे व गीता जैन या पाच नगरसवेकांनीही शिवसेनेच्या पारड्यात आपली मते टाकली. तरीही शिवसेनेचे बळ तोकडेच पडले. हसनाळे यांना ५५ तर शिर्के यांना ३६ मते मिळाली.