खातेवाटपाचा तिढा कायम, आता अंतिम निर्णय पवारांच्या हातात

Sharad Pawar

मुंबई : अनपेक्षितपणे स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन पाच दिवसांचा कार्यकाळ उलटला असला, तरी खातेवाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. मंत्र्यांच्या बंगल्यांचं वाटप वेळेत झालं, मात्र खातेवाटप झालेलं नाही. त्यातच आता हा वाद महाविकास आघाडीचे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कोर्टात गेल्याचं म्हटलं जात आहे.

राष्ट्रवादीच्या वाट्याला आणखी एक महत्त्वाचं खातं येणार होतं… मात्र – अजित पवार

गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाविकास आघाडीचे नेते सकाळी ‘आज संध्याकाळपर्यंत’, तर संध्याकाळी ‘उद्या सकाळपर्यंत’ खातेवाटप जाहीर होईल, असं सांगत आहेत. त्यामुळे खातेवाटप जाहीर करण्यास नेमका कधीची मुहूर्त लागणार, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. परंतु काँग्रेसमुळे हे खातेवाटप रखडल्याची चर्चा आहे.

कृषी आणि ग्रामविकास या ग्रामीण भागाशी संबंधित खात्यांसाठी काँग्रेसने आग्रहाची भूमिका घेतली आहे. तर सहकार खात्यावरही काँग्रेसने दावा केला आहे. मात्र शिवसेनेचा कृषी खातं सोडण्यास नकार असल्यामुळे अंतर्गत कलह वाढला आहे. दुसरीकडे, बंदरे, खारभूमी, सांस्कृतिक खाती सोडण्यास शिवसेना तयार आहे. मात्र कमी महत्त्वाची खाती घेण्यास काँग्रेसने सपशेल नकार दिला आहे. त्यामुळे खातेवाटपावरून काँग्रेस-शिवसेनेत धुसफूस सुरु असल्याचं म्हटलं जातं. आता खातेवाटपावर शरद पवार काय निर्णय घेणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस मंत्री अशोक चव्हाण यांच्यामध्ये बैठकीतच खडाजंगी उडाल्याची बातमी काल प्रसारमाध्यमांमध्ये झळकली होती. अजित पवारांनी या चर्चांचं खंडण केलं असलं, तरी खातेवाटपाचा घोळ पाहता तिन्ही पक्षांमध्ये खेचाखेची होत असल्याचं पाहायला मिळत आहे. निर्णायक बैठकीत शिवसेनेने आपल्या पारड्यात तब्बल २४ खाती पाडून घेतली. तर गृह खातं राष्ट्रवादीला सोडल्याने सेनेकडे आता २३ खाती आहेत.