लेखक नवनाथ गोरे यांना राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचा मदतीचा हात

SAngli

सांगली : नवनाथ गोरे हे एम.ए. बीएड्‌ झालेले उच्चशिक्षित तरुण. त्यांनी स्वतःच्या जीवनप्रवासाची शब्दमाळ गुंफली आणि “फेसाटी’ नावाने ती पुस्तक रुपाने जन्माला घातली. त्यांच्या या पहिल्याच पुस्तकाने छाप उमटवत साहित्य अकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार खूप मानाचा शिरपेचातील तुरा समजला जातो.

पण या तुऱ्यापलिकडे नवनाथ यांचे हात रिकामेच राहिले. भाकरीसाठीचा संघर्ष काही चुकला नाही. त्यांना पुरस्कार मिळाल्यानंतर काही ठिकाणाहून मदत मिळाली, नगरमध्ये हंगामी नोकरीही मिळाली, मात्र कोरोनाने ती गेली. संकट गडद झाले. हातातोंडाची गाठ पडेना झाल्यावर नवनाथ यांनी शेतमजुरी सुरु केली. हे समजताच नवनाथ गोरे यांना भारती विद्यापीठाचे कार्यवाह, राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांनी या लेखकाला भारती विद्यापीठात नोकरी देण्याची ग्वाही दिली.

अनेकांनी नवनाथ यांचा संपर्क मिळवून मदतीसाठी हात पुढे केला.खानदेश विचार मंचने मदत देण्याची घोषणा केली आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांचे कार्यकर्ते भरीव मदत करणार आहेत. त्यांना हवीय ती नोकरी भारती विद्यापीठाने देण्याचे ठरवले आहे. जतचे आमदार विक्रम सावंत यांनी या विषयावर श्री. विश्‍वजीत कदम यांच्याशी चर्चा केली.

महाराष्ट्रातील कोणत्याही क्षेत्रातील गुणवंत परिस्थितीने रंजला, गांजला असेल तर त्याला हात देऊन उभे करण्याचे काम डॉ. पतंगराव कदम यांनी केले. तोच वारसा आणि तीच परंपरा आम्ही चालवतोय. नवनाथ गोरे यांना भारती विद्यापीठात हक्काची नोकरी आम्ही देऊच, शिवाय ते लिहते रहावेत, यासाठीही पाठबळ देऊ, अशी ग्वाही राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER