रमजान ईदनिमित्त राज्यातील जनतेला मंत्री नवाब मलिक यांच्या शुभेच्छा

मुस्लिम बांधवांनी नमाज पठण घरीच करण्याचे आवाहन

Nawab Malik

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक विकास आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी ईद-उल-फितर (रमजान ईद) निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच पठण करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मंत्री श्री. मलिक म्हणाले, कोरोना विषाणूच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी राज्यात मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु आहे. या दरम्यान आलेल्या पवित्र रमजान महिन्याच्या काळात मुस्लिम बांधवांनी संयम पाळून आपले सर्व धार्मिक विधी घरीच पार पाडले. कोणतेही गर्दी होणारे कार्यक्रम टाळून मुस्लिम बांधवांनी तरावीहची नमाज, रोजा सहेरी, रोजा इफ्तार आदी धार्मिक विधी घरीच केले. अजूनही कोरोनाचे संकट संपले नसल्याने तसेच राज्यातील लॉकडाऊनही सुरु असल्याच्या कारणाने रमजान ईदची नमाजही घरीच पठण करण्यात यावी असे आवाहन विविध मुफ्ती, हजरात व मौलाना आदींनी केले आहे. त्यास अनुसरुन रमजान ईदचे सर्व धार्मिक विधी घरीच करावेत, असे आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले आहे.

ईदनंतर गल्ली, मोहल्ल्यांमध्ये गर्दी करु नका. प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यापेक्षा मोबाईलवरुनच नातेवाईक आणि मित्रमंडळींना शुभेच्छा द्या. तसेच जगावरील कोरोनाचे संकट लवकर दूर होण्यासाठी प्रार्थना करावी, असेही आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले आहे.


Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER