मंत्री १० हजार लोक जमवतो, अधिवेशनाला मात्र कोरोना! फडणवीसांची ठाकरे यांच्यावर टीका

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray.jpg

मुंबई : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर सरकार अधिवेशनापासून म्हणजेच विरोधकांच्या आणि जनतेच्या प्रश्नापासून पळ काढते आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. ते म्हणालेत की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत; जे अधिवेशनात मांडायचे आहेत. त्यासाठी आम्ही पूर्ण अधिवेशन घेण्याची मागणी केली; पण सरकार कायद्यात न बसणारे अधिवेशन घेते आहे.

नियम सत्ताधाऱ्यांना नाहीत का?
कोरोनामुळे पूर्ण अधिवेशन घेता येत नसेल तर आता लेखानुदान घ्या आणि नंतर पूर्ण अधिवेशन घ्या, अशी मागणी भाजपाने केली आहे. पण कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनासाठी तयार नाही. इथे कोरोना म्हणता आणि बाहेर तुमच्या मंत्र्यांचे सगळे कार्यक्रम सुरू आहेत. तुमच्या मंत्र्यांना कुठलेच नियम नाहीत का? नियम फक्त विरोधी पक्षासाठी आहेत का? अधिवेशन टाळण्यासाठी कोरोनाचे नाटक सुरू आहे, असा आरोप फडणवीसांनी केला.

उघडे पडण्याच्या भीतीने सरकार पळ काढते
संजय राठोड (Sanjay Rathod) प्रकरण असो की वीज कापण्याचे. विरोधी पक्ष आक्रमक राहील, असा इशारा फडणवीसांनी सरकारला दिला. या प्रकरणात उघडे पडण्याच्या भीतीने सरकार अधिवेशनापासून पळ काढते आहे, जनतेच्या प्रश्नांशी सरकारला काही देणे – घेणे नाही, असे फडणवीस म्हणालेत. बिझनेस अॅडव्हायझरी कमिटीवरून वॉकआऊट करत असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

सरकारला स्वत:च्या आमदार-मंत्र्यांची भीती
सरकार स्वतःच्या आमदार-मंत्र्यांना घाबरते आहे म्हणून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेत नाही. निवडणुकीत काही वेगळे चित्र निर्माण होईल का? अशी सरकारला भीती आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा विषयच अजेंड्यावर आणला नाही, असा टोमणा फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना मारला.

अधिवेशनाचा कार्यक्रम – पहिला आठवडा अधिवेशन, दुसऱ्या आठवड्यात बजेट आणि दोन दिवस चर्चा असा ठरल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे. अधिवेशनात जेवढा कालावधी मिळेल त्या कालावधीत सर्व आयुधांचा वापर करून सरकारला उघड पाडू, असा इशारा फडणवीसांनी सरकारला दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER