पंकजा मुंडेंची राजकीय अस्थिरता आणि धनंजय मुंडे मंत्री; योगायोगाने बहीण-भाऊ एकत्र येणार का?

गहिनीनाथगडावर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर

Dhananjay Munde AND Pankaja Munde

बीड : भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या मनातील राजकीय अस्थिरता राज्याच्या जनतेपासून आणि पक्ष अधिका-यांपासून लपलेली नाही. या निमित्ताने मुंडे बहीण-भाऊ एकत्र येणार का, अशी कुजबूज गहिनीनाथगडावर या दोघा बहीण-भावांना एकत्र पाहिल्यानंतर बीडमध्ये सुरू झाली आहे.

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथगड येथे संत वामनभाऊ महाराज यांच्या आजच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुलाल उधळण्यात आला. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपा नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे दोघेही बहीण- भाऊ एकाच मंचावर पाहायला मिळाले.

धनंजय मुंडे म्हणाले –
मागील १६ वर्षांपासून धनंजय मुंडे हे रात्री मुक्काम करून सकाळी महापूजा केल्यानंतर निघून जात. जाहीर कार्यक्रमाला थांबत नव्हते. या वेळी मंत्री असल्यामुळे महंत विठ्ठल महाराज यांनी धनंजय यांना व्यासपीठावरून बोलण्याची सूचना केली. दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाला पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह या भागातील आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार साहेबराव दरेकरसह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. व्यासपीठावर आरतीच्या वेळी मुंडे बहीण-भाऊ एकत्र उपस्थित झाले. मात्र, धनंजय यांनी सुरुवातीलाच भाषण केले. धार्मिक कार्यक्रमात मी कधीही भाषण करत नाही; मात्र महंतांच्या सूचनेवरून बोलत आहे. वामनभाऊंचा भक्त म्हणून गडावर येतो. सत्तेच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करण्याची शक्ती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. कोणाचाही नामोल्लेख केला नाही.

तर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र आम्ही पराभूत झालो असलो तरी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी चांगले काम करावे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीही विकासाची गती कायम ठेवावी, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच, कोणतेही पद आपल्याकडे नसले तरी सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.