महाराष्ट्रानंतर दिल्लीत रातोरात कोण कोणाचं ऑपरेशन करेल हे लवकरच दिसेल – छगन भुजबळ

Chhagan Bhujbal

नाशिक :- दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपा पुन्हा महाराष्ट्रात मिशन कमळ राबवणार असल्याचे सूत्रांकडून समजते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे मंत्री नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

“भाजपला मिशन कमळ करू द्या, आमच्याकडे धनुष्यबाण आहे. किती वेळात बाण सोडावे यासाठी घड्याळ आणि आमचा हातही मजबूत आहे.” अशी टीका भुजबळ यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीत १०५ आमदार जिंकून आले. राज्यात सर्वांत मोठा पक्ष म्हणून मिरवता आले; मात्र तरीही सत्तेपासून दूर राहिल्याचे दुःख भाजपाच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत असते. तसेही भाजपाला रातोरात राजकीय खेळी खेळण्याची सवय आहे. ते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ घेऊन दाखवलंच आहे. आता दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल ११ तारखेला लागणार आहे. त्यामुळे कोणतं राजकीय ऑपरेशन होणार? आणि कोण कोणाचं ऑपरेशन करणार? हे लवकरच दिसेल.” असा टोला छगन भुजबळ यांनी भाजपाला लगावला.

दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महत्त्वाचे नेते दिल्लीत कामाला लागले होते. भाजपासाठी दिल्लीची निवडणूक प्रतिष्ठेची  झाली आहे. मात्र, दिल्लीत सध्या तरी आपचाच बोलबाला आहे.

राज्य भाजपा नेते दिल्लीहून परतल्यानंतर लगेच राज्यात मिशन कमळ राबवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर भुजबळांनी भाजपाला दिल्लीवरून चिमटे काढले आहेत.

महाराष्ट्रातील नेतृत्व फडणवीसच; ‘मिशन कमळ’ची जबाबदारीही त्यांच्यावर