मन नक्षत्रांचे रान अवकाशी अवघडलेले !

Work From Home

हाय फ्रेंड्स !आजची स्त्री विविध क्षेत्रातील आव्हाने पेलत असताना जणू तिचे मन नक्षत्रांना मिळवू पाहत असते. मात्र या आकाशाला गवसणी घालताना त्याचवेळी , तिला तिचे सगळ्या बाजूंनी अवघडलेले अवकाश पण पेलायचे असते. एकाच वेळी घर आणि कामाचे ठिकाण या दोन्ही डगरींवर हात ठेवताना अवघड जात असते. पण हे समजून मात्र कुठेच घेतले जात नाही. मग सुरु होतो ताण-तणाव, चिडचिड !

कहानी- पासवाले घर की बहू ( Hindi Kahani - Paswale Ghar Ki Bahu ) | Meri  Saheli Hindi Magazineकाल निमिषा घरी आली तिरीमिरीत. पोटात भुकेचा डोंब उसळलेला. नूकताच नव्याने कलरिंग केलेल्या बंगला, गेल्या महिनाभर चाललेलं ते काम, तो पसारा, पुन्हा वर्क फ्रॉम होम (Work From Home) पण सुरू होते. थोड्या वेळापूर्वी आवरलेला हॉल, बाहेरून येताच मुलांनी परत पसरवून ठेवलेला दिसला आणि तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. नुकत्याच काम करायला सुरुवात करणाऱ्या अलका मावशींना तिने जोरात झापले. आजकाल असंच होतं. घरचं ,बाहेरच ,ऑफिसचा असे सगळे ताण हाताळताना एकदम चिडायला होतं.

शोभनाचे मिस्टर बहारीनला नोकरीनिमित्ताने असतात. दोन मुले व सासू-सासरे यांची जबाबदारी तिच्यावर आहे. सध्या पूर्ण कुटुंबाची सगळी जबाबदारी तिला वहावी लागते. हे करताना तिला खूप एकटे वाटते.

आजच्या काळात स्त्रियांचे कार्यक्षेत्र आणि कामाच्या पद्धती आणि जबाबदाऱ्या खूप बदलल्या आहेत. रसिका सांगत होती ,आजकाल तिच्या कंपनीतल्या प्रत्येक जण विशेषतः मुली आणि स्त्रिया घरकाम व ऑफिसचे काम यांच्यातला बॅलन्स ठेवण्यासाठी, त्रास होत नसल्याने स्ट्रेस खाली आहेत. आणि त्यासाठी विशेष थेरपी सेशन्स घेत आहेत.

बऱ्याच जणांची आजकाल तक्रार असते कि मुली उलटी उत्तरे देतात, लवकर चिडतात. म्हणून थोडा त्यादृष्टीने विचार केल्यावर त्याची कारणे लक्षात येऊ लागली. त्यांची सहनशक्ती कमी होण्यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे स्त्रियांमधील चिडचिडेपणाचे ,दुरुत्तरे देण्याचे हे समर्थन असू शकतच नाही .पण जेव्हा मोठ्या प्रमाणात समाजात एखादा बदल जाणवत असेल तर त्यामागील मानसिकतेचा विचार हा करावाच लागतो. एका वाक्यात सांगायचं तर त्यांच्यावरील भावनिक व व्यावहारिक अपेक्षा प्रमाणाबाहेर वाढल्या आहेत. घरगुती व कामाच्या ठिकाणी उत्तम कामगिरी करण्याच्या अपेक्षांचे ओझे स्त्रियांना अधिक कष्ट करण्यास प्रवृत्त करते. स्त्रिया सर्वच क्षेत्रात काम करीत असल्या तरी मुलांच्या संगोपनात मदत करणाऱ्या पुरुषांचे किंवा घरकामात मदत करणाऱ्या पुरुषांचे कोण कौतुक केले जाते. आणि हे करण्यात स्त्रियाच आघाडीवर असतात .यात असूया असली तरीही या असूयेची काळोखी किनार ह्यामुळेच की अशा घरकामात, संगोपनात सहभागी होणाऱ्या पुरुषांची संख्या खूप कमी आहे.

घरातील कुठल्याही बाबतीत मत देताना पुरूषांना झुकते माप नव्हे पहिले स्थान असते. याउलट तिचा निर्णय वा मत निरर्थक ,फुटकळ किंवा विचारण्याची गरजच नसलेल असे मानले जाते. नोकरी करियरच कौतुक तर होत नाहीच ,पण “नसेल झेपत तर सोडुन दे नोकरी !”असेच सल्ले मिळतात. मुलांच्या भविष्याबाबत किंवा संगोपनात कुठेही कमतरता जाणवली किंवा गृहिणी ,सून, बायको म्हणून कुठेही कमी पडली तर एक प्रकारची अपराधीपणाची बोच तिला लागून राहते. अशावेळी ती अपयशी व कार्यक्षम असल्याचेच तिच्यावर बिंबवले जाते.

कौटुंबिकच असे नव्हे तर सामाजिक स्तरावरही अत्याचार, लैंगिक शोषण यांच्याशी सामना करावा लागतो. सतत याठिकाणी उठबस आहे ,तेथेही स्वतःची सुरक्षा करायची, सदैव दक्ष आणि सजग राहायचे हे कामही तिला करावे लागते. कामाच्या ठिकाणी होणारे भेदाभेद हे तर नेहमीचेच. एकूणच काय सामान्य तडजोड आणि स्त्री म्हणून तडजोड अशा दोन्ही पातळ्यांवर लढतांना एक प्रकारची आक्रमकता तिच्या दिसायला लागते .प्रत्येक गोष्ट नियंत्रणाबाहेरची आहे ही जाणीव,व त्यातून निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा अशा अयोग्य मार्गाने बाहेर पडण्यासाठी प्रवृत्त करते, आणि मग वड्याचं तेल वांग्यावर निघते. त्याचा राग हा मुलांवर, घरातल्या काम करणाऱ्यांवर आणि शेवटी नवऱ्यावर निघतो.

म्हणूनच

१) सर्वप्रथम परिस्थिती सांभाळता येणं शिकलं पाहिजे. परिस्थिती बदलू शकत नाही मग त्याला सामोरं कसं जायचं? वेगळ्या पद्धतीने मार्ग कसे काढायचे? याचा विचार पहिल्यांदा करावा लागेल.

२) व्यायाम व आहाराबरोबरच विश्रांती, ती शरीराला आणि मनाला देखील तितकीच आवश्यक असते.

३) भावना व्यक्त करता येणं, परिस्थितीशी उगीचच झगडत न बसण, ही काळजी वेळीच घेणं फायद्याचं होतं.

४)मुख्य म्हणजे वास्तवाचे भान ठेवून स्वतःकडून व दुसर्‍यांकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे थांबवले पाहिजे.

५) जे महत्त्वाचं ते मी आत्ता करीन. कमी महत्त्वाच नंतर करीन किंवा काही जबाबदाऱ्या नाकारायलाही शिकेन .म्हणजे माझी तब्येत ठीक नसताना पाहुणे येणार असतील तर समोरच्याला न दुखवता मी माझी अडचण स्पष्ट सांगीन.

६ ) स्वतःच्या भावना जाणून घेऊन काम, हे ताण नियंत्रणासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे.

७) सगळ्यात महत्वाचा म्हणजे अति धावण्यामुळे हरवलेला संवाद ! घरातल्या लोकांना बरोबर दोन क्षण शांत निवांत घालवता येणे हेच सगळ्यात महत्वाचे आणि आवश्यक म्हणता येईल.

८) आवश्यक असेल तेव्हा समुपदेशकाची मदत, आणि सायकोथेरपी सेशन्स जरूर घ्यावीत. त्यात कुठेही कमीपणा मानू नये.

फ्रेंड्स ! अशी सगळी पथ्य-पाळली तर नक्षत्रांचे रान पिंजायला निघालेल्या आपल्या सख्यांना “दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा ? “हा प्रश्न पडणार नाही, तर अवकाश तिच्यासाठी खुले असेल.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER