मि. इंडिया खिताब पटकावणारा मराठमोळा बॉडी बिल्डर जगदीश लाड याचे निधन

Jagdish Lad - Maharashtra Today

मुंबई :- कोरोना संसर्गाने अनेकांना जीव गमवावा लागत आहे. कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने तर तरुणांना कवेत घेतले असून त्यांच्या मृत्यूचा आलेखही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच आता मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड यालाही कोरोनाने हिरावून नेले आहे. बॉडी बिल्डिंगमधील मानाचा मि. इंडिया हा किताब पटकावणारा जगदीश लाड केवळ ३४ वर्षांचा होता. जगदीशच्या जाण्याने लाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

जगदीशला काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्याच्यावर गुजरातमधील बडोदा इथे उपचार सुरू होते. तिथेच त्याने जगाचा निरोप घेतला. जगदशीसारख्या शरीरयष्टी असलेल्या तरुणाला कोरोना हतबल करत असेल तर जे कोणी कोरोनाला मनावर घेत नसेल, त्यांनी आता पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. मूळचा सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचा असणारा जगदीश लाड हा नवी मुंबईत राहायचा. नंतर तो बडोद्याला स्थायिक झाला होता. तिथे त्याने स्वत:ची व्यायामशाळा सुरू केली होती. जगदीश लाडने नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालं होतं.

मिस्टर इंडिया स्पर्धेतही जगदीशने आपली छाप पाडत दोन वेळा गोल्ड मेडल जिंकलं होतं. दरम्यान वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्यपदक मिळवलं होतं. दरम्यान, जगदीश लाडच्या निधनाने बॉडीबिल्डिंग विश्वावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोशिएशन आणि मुंबई असोशिएशनने त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button