शेवटपर्यंत बाळासाहेबांच्या आदेशाची वाट पाहात राहीन- इम्तियाज जलील

prakash

औरंगाबाद :-ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एआयएमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची युती तुटल्याची घोषणा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केली होती. मात्र आता जलील यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे नवा संभ्रम निर्माण झाला आहे. ‘एमआयएमने कुठलंही लॉक लावलेलं नाही. प्रकाश आंबेडकर यांनी मला आदेश करावा, मी त्यांच्या आदेशाचं पालनच करेन. आजही मी आंबेडकरांना वंचितचा सर्वेसर्वा मानतो. शेवटपर्यंत बाळासाहेबांच्या आदेशाची वाट पाहात राहीन.’ अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चेदरम्यान एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीतील दुफळी बाहेर येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सन्मानजनक जागा न दिल्याने एमआयएमने वेगळे होण्याचा निर्णय घेत युती तुटल्याची घोषणा केली होती. “२८८ पैकी ८ जागा एमआयएमसाठी सोडत असल्याने युती तोडत आहे.” असे  खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले होते. तसेच “वंचितसोबतची युती तोडण्याचा मोठा निर्णय मी पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीशिवाय घेऊ शकत नाही. हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांनीच घेतला आहे.” असे जलील म्हणाले होते. मात्र आता आंबेडकर यांच्यावर टीका करणाऱ्या जलील यांनी  असं वक्तव्य केल्यानं वंचित आघाडीचं सूत पुन्हा जुळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

ही बातमी पण वाचा : मी विधानसभा निवडणूक लढणार नाही- सुजात आंबेडकर