देशी कोंबडी पालनातून कमवता येतील लाखो रूपये..

देशी कोंबडी पालनातून कमवता येतील लाखो रूपये..

कोरोनामुळ (Corona) देशभरात झालेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेकांचे रोजगार गेलेत. बाहेरच्या शहरात स्पर्धा परिक्षेला असणारे युवकही गावी परतलेत. अशा परिस्थीतीत पैश्याच्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतंय. कमी गुंतवणूकीत आणि कमी कालावधीत उत्पन्नाच्या शोधात अनेक जण आहेत. त्यांच्यासाठीच ही माहिती.

भारतात मोठ्याप्रमाणात लोक मंसाहार करतात. मटणाचे वाढलेले भाव आणि बॉयलर कोंबडीच्या मंसाहाराला कंटाळलेल्या लोकांसाठी देशी कोंबडीचे मटण चांगला पर्याय ठरू शकतो. कमी पैशाच्या गुंतवणूकीत शेतीकडे लक्ष देवून तुम्ही हा शेतीपूरक व्यवसाय करू शकता.

देशी कोंबड्यांचं पालन करण्यासाठी दोन उद्दिष्ठ ठेवता येतात.

१. मांसासाठी

२. अंड्यासाठी

मांसासाठी प्रामुख्याने

१. वनराज

२. गिरीराज

३. श्रीनिधी

४. कलिंगा ब्राऊन या जातीच्या कोंबड्याचे पालन केले जाते. गिरीराज आणि वनराज या कोंबड्याचे पालन महाराष्ट्रात अधिक प्रमाणात होत असल्याने तुम्ही या जातीच्या कोंबड्यांचा विचार करू शकता.

अंडी आणि मांसासाठी

१.ओरिजनल गावरान

२.डीपी क्रॉस (गावरानचा भाग)

३.कावेरी

४.ग्रामप्रिया

५.ऱ्होड आइलैंड रेड (आरआर) अंड्यांसाठी एक नंबर

अनूभव घेण्यासाठी
देशी कोंबडीपालनाचा निर्णय घेतल्यानंतर आधी १०० कोंबड्या भरायच्या. नंतर दुसरा लॉट २०० आणि तिसरा ५००चा. कोणताही व्यवसाय करण्याआधी त्यातील अनूभव घेणे महत्त्वाचे ठरते. जास्त कोंबड्या पाळल्यामुळं जास्तीचं उत्पन्न मिळेल असं गणित डोळ्यासमोर ठेवून अनेक जण जास्त कोंबड्या पाळतात. परिणामी नियोजनात मागे पडून त्यांना, मोठ्या नूकसानीला सामोरे जावे लागते.

शेडची माहिती
किमान ७५० स्क्वेअर फीटचं पक्क शेड असायला हवं. आणि आतल्या बाजूला कोबा गरजेचा असतो. त्यामुळं ते धुवायला, साफ करायला सोईचं जातं. कोंबड्यांना होणारे आजार आणि जंतू ओलाव्यात निर्माण होतात. त्यामुळं कोब्यावर व्यवस्थीत तांदळाची तूस पसरावी.

लाईट कनेक्शन गरजेचं.
रात्री जर अंधार असेल तर पिलं खात नाहीत. आणि जर वेळेत पिलांनी खाद खाललं नाही तर त्यांचे म्हणावे इतके वजन वाढत नाही. त्यामुळं शेडवर लाईट असायलाच हवी.

शुद्ध पाणी गरजेचं
खराब पाण्यामुळं मोठा फटका बसू शकतो. त्यामुळं सुरुवातीच्या काही दिवसांसाठी पाण्याच्या शुद्धतेकडं लक्ष देणं गरजेचं ठऱतं.

ब्रुडींग लसीकरण आणि मेडीसीन

ब्रुडींग

पिल्लांचे तापमान संतुलीत ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी शेडमध्ये लाईट असायला हवी. बाहेरील थंड हवा आत येवू नये म्हणून शेडच्या दोन्ही बाजूंनी कागद पसरायला हवा. थंडी वाढल्यास लाईटचे व्होल्टेज वाढवायला लागते ज्यामुळे पिलांना पुरेशी उष्णता मिळते. यामुळं पिलाचे वजन वाढण्यास मदत होते

लसीकरण

देशी कोंबड्यांचे पालन करताना लसीकरण हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. सुरुवातीच्या काही दिवसात मानेत इंजेक्शन देवून किंवा पाण्यातून लस दिली जाते. कोंबडी तयार झाल्यानंतर दुसरी लस डोळ्यातून दिली जाते. यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.

लसीकरण हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे योग्य वेळी लसिकरण करावे.
१ दिवस – मरेक्स HVT – मानेतुन इंजेक्शन
२ दिवस – रानीखेत / मानमोडी लसोटा – डोळ्यातून किंवा नाकपुडीतून एक थेंब
१४ दिवस – गमभोरो IBD – डोळ्यातून किंवा नाकपुडीतून एक थेंब
२१ दिवस – लसोटा बूस्टर – पिण्याच्या पाण्यातून
२८ दिवस – गमभोरो बूस्टर – पिण्याच्या पाण्यातून
३५ दिवस – देवी / फाउल पॉक्स – चामडी खाली इंजेक्शन

अंडी उत्पादनासाठी पक्षी ठेवणार असाल, तर दर महिन्याला बूस्टर डोस द्यावेत.

खाद्याचे नियोजन

पहिले ८ ते १० दिवस प्री स्टाटर द्यावं, कारण ते आकारानं लहान असतं. लहान पिलं लवकर खातात आणि त्यामुळं त्यांचे वजन वाढते. नंतरचे १० दिवस ते ३० दिवस स्टार्टर, आणि शेवटचे ३० दिवस फिनीशर द्यावे. खाद्य देण्याच्या वेळा ठरवाव्यात.

विक्री आणि मार्केटींग

गावात गावरान कोंबडीच चिकन दुकान टाकता येतं. (बॉयलरच्या किंमतीत गावरान चिकन देणं शक्य आहे.) गावच्या मेनरोडला पोस्टर लावू शकतो. कटींगच्या दुकानात होलसेल रेटमध्ये देवू शकता. सोशल मिडीयावर जाहीरात करता येते. चार पैसे कमी मिळाले तर चालतील पण पक्षांची विक्री वेळेत व्हायला हवी.

आता साधारणपणे देशी कोंबड्या पाळायच्या आणि वाढवायच्या या बाबी आपण लक्षात घेतल्यात. आता शेवटी एकूण उत्पन्नाची एकूण गोळाबेरीज करूयात.

खर्च

३०रु दराने ५०० पिलांसाठी १५ हजार रुपये लागतील. शेडमध्ये टाकायला तांदळाची तूस किंवा लाकडी भूसा ७रु दराने १०० किलो लागेल त्यासाठी ७००रु. खाद्यासाठी ३३रु किलोने १७५ किलो खाद्या लागेल त्याचे होतात ५७,७५० रु. तर वीजबीलासाठी २ हजार रुपये लागतील. लस आणि दवापाण्यासाठी २ हजार असे एकूण ७९,९५०रु खर्च येईल.

उत्पन्न

साधारणतः पाच टक्के पिलांची मरतूकही गृहीत धरावीच लागते. म्हणजे ५०० पैकी ४७५ कोंबड्या तयार होतील. याचे प्रमाणही घटू किंवा वाढू शकते. उरलेल्या ४७५ पिलांचे वजन २.५ ते ३ महिन्यात त्यांचे वजन १.५ किलो होते.

४७५ x १.५ = ७१२ किलो

विक्रीसाठी ७१२ किलो माल तयार होईल. त्याचा अंदाजे दर १७० रु किलो धरूयात. १७० हा किमान दर आहे. याच्या खाली दर घसरत नाही. यापेक्षा जास्तीचा दरदेखील मिळू शकतो.

७१२x१७० = १,२१,०४० इतके एकूण उत्पन्न आपल्याला मिळू शकते. तर १,२१,०४० – खर्च ७९,९५० = ४१,०९० निव्वळ नफा. कमावता येतो.

शेतीपूरक व्यवसाय म्हणून अनेक लोक आता कुकुट पालनाकडे वळताहेत. देशी कोंबडीच्या पालनातून तुम्ही देखील अशा पद्धतीने नवा व्यवसाय सुरु करू शकता.

Disclaimer:- केवळ मार्गदर्शनासाठी आम्ही काहीही दावा करत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER