दूध – जीवनीय अमृतासमान आहार !

मध्यंतरी एका कंपनीची दूधाची जाहिरात यायची. इतक्या छान आकर्षकपणे दुधाचे गुण दाखविले होते की दूध दूध म्हणत एक ग्लास फुल दूध प्यावेच. नुकत्याच जन्म झालेल्या बाळाला सात्म्य किंवा पचणारा, जीवन देणारा, वाढ करणारा दूध, हा एकमेव पदार्थ आहे. आयुर्वेदात क्षीरवर्ग (दूग्ध प्रकार) खूप विस्तृत वर्णित आहे. यात दूधाचे गुण विविध प्राण्यांच्या दुधाचे गुण सांगितले आहे. सुश्रुताचार्यांनी व्यवहारात उपयोग होणाऱ्या 8 प्रकारच्या दुधाचे गुणदोषांचे वर्णन केले आहे. दूध आहार व औषध दोन्ही रुपात कार्य करणारे आहे.

दूध मधुर रसाचे, सर्व धातुंना वाढविणारे, शरीरात मार्दवता आणणारे स्निग्धता आणणारे, वीर्य वाढविणारे, अनेक व्याधींना दूर करणारे, वयस्थापन (delayed aging) आयुवर्धक, बालक – वृद्ध दोघांनाही पथ्यकर, भूक – व्यायाम – मैथून यामुळे ज्यांना अशक्तपणा कृशता आली आहे त्यांना हितकर अतिशय पथ्य आहार आहे. पचायला जड, कफ वाढविणारे आहे.

गाईचे दूध रोगांना उत्पन्न न करणारे, रसायन, जीवनशक्ती विशेष वाढविणारे आहे. मेधा, बल वाढविणारे आहे. बाळंतीणीचे स्तन्य वाढविणारे आहे. थकवा कमी करणारे आहे. वर्ण चांगला करणारे. रक्तविकार, क्षय इ. व्याधी दूर करणारे आहे.

म्हशीचे दूध पचायला सर्वात जड आहे तसेच निद्राजनक आहे. म्हणूनच ज्यांची पचन शक्ति खूप चांगली असते, ज्या लोकांना झोप येत नाही अशा व्यक्तींनीच घ्यावे. हे गाईच्या दूधापेक्षा अधिक जड आणि थंड प्रकृतीचे आहे. त्यामुळे पचन शक्ती कमी आहे, अतिनिद्रा, कफविकार, स्थूल व्यक्तींनी म्हशीचे दूध घेऊ नये. गाय म्हैस व्यतिरिक्त आयुर्वेदात बकरी, मेंढी, घोडी, हथिणी, उंटणी दुग्धाचे वर्णन मिळते.

हे सर्व गुण पाहता दूध घ्यायलाच पाहिजे. परंतु काही गोष्टी नक्कीच ध्यानात ठेवाव्या. सर्व प्रकारचे दूध गरम करुनच प्यावे. कच्चे दूध घेऊ नये. धारोष्ण दूध गुणवान असते परंतु काही वेळ गेल्यावर त्याचे गुण हिन होतात. आपल्या घरापर्यंत येईस्तोवर तसेही ते धारोष्ण नसतेच. दुधाची बासुंदी पचायला जास्त जड पण बृहण करणारी आहे.

वात पित्त विकारांकरीता, गर्भिणीना होणाऱ्या चक्कर मळमळ त्रासावर दूध उपयुक्त आहे.

आजकाल “गोल्डन मिल्क” म्हणजेच हळदीचे दूध प्रचलित आहे. ते कफ कमी करणारे आहे. परंतु सकाळी घेणे योग्य आहे.

दूध कोणतेही फळासह घेऊ नये. मिल्कशेक आयुर्वेदानुसार विरुद्धाहार आहे. आंबा ( पिकलेला गोड) याला अपवाद आहे.

नाश्ता व दूध एकत्र घेऊ नये. दुपारी – रात्री जेवणानंतर लगेच दूध घेऊ नये.

ज्या मुलांना वारंवार सर्दी खोकला किंवा नाक सर्दीने बंद होणे ताप येणे असे आजार होत असतील तर कफ काळात ( सकाळी ६ ते १० ) दूध पिणे हे एक कारण सहसा दिसून येते. काही काळ या वेळेत दूध घेणे बंद केले तर त्रास कमी झालेला दिसतो.भूक न लागता दूध घेणे चुकीचे आहे. त्यामुळे दूधाचे अजीर्ण होते. चिमूटभर सुंठ किंवा हळद दुधात उकळले तर कफाचा त्रास होत नाही.

तापेमधे भूक मंदावणे भूक न लागणे हे मुख्य लक्षण दिसते. त्यामुळे ताप असल्यास दूध घेऊ नये.

दूधात कोणते पदार्थ टाकून घ्यावे ? तर काहीच गरज नाही कारण दूध हेच सर्वोत्तम गुणात्मक आहे. पचायला जड, बाजारात मिळणाऱ्या पावडरने अधिकच भूक मंदावते. घ्यायचे असेल तर शतावरी कल्प, वजन बल वाढविणारा त्रास न देणारा कल्प, चांगला. याशिवाय दूधात सुंठ, हळद, तूप, साखर अवस्थेनुसार घेऊ शकतो.

दूध मांसे, मास मूगाची डाळ, मूळा, फळे एकत्र खाणे त्वचाविकार करणारे आहे.

दूध अमृतासमान जीवनीय आहार आहे. आयुर्वेदात औषधी कल्पांमधे विविध प्रकारे दूध वापरण्यात येते. अनेक औषधे दुधासह घेतल्याने गुणवर्धन होते. दूध घेणे हे हितकरच नित्य सेवनीय आहे परंतु उपरोक्त गोष्टी नक्कीच टाळाव्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER