नार्वेकरांनी करून दाखवलं, अपक्ष आमदाराचा शिवसेनेत प्रवेश करून दाखवला

Uddhav Thackeray

मुंबई : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात शिवसेनेला (Shivsena) नवसंजीवनी मिळाली आहे; कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवबंधन बांधत त्यांनी अधिकृत पक्षप्रवेश केला. दरम्यान, ही सर्व किमया घडवली ती म्हणजे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापनेसाठी मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना अपक्ष म्हणून निवडणूक जिंकलेले शंकरराव गडाख यांना विशेष विमानाने मुंबईत आणणारे हे नार्वेकरच होते. आधी पाठिंबा आणि आज थेट पक्षातच आणण्याची किमया त्यांच्या हातून घडली आहे. विशेष म्हणजे गडाख यांच्या पक्षप्रवेशावेळी नार्वेकरही उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे‌ माजी आमदार आणि उपनेते अनिल भैय्या राठोड यांच्या निधनानंतर अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली होती. मात्र गडाखांनी शिवबंधन हाती बांधल्याने पक्षाला जिल्ह्यात नवसंजीवनी मिळणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत नगरमध्ये शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नव्हता. गडाख यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केल्याने नगर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढणार आहे.

शंकरराव गडाख यांनी अहमदनगरमधील नेवासा विधानसभा मतदारसंघातून ‘क्रांतिकारी शेतकरी पक्षा’कडून निवडणूक लढवली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी त्यावेळी ‘अपक्ष आमदार’ असलेल्या गडाखांना विशेष विमानाने मुंबईत आणलं होतं. शंकरराव गडाख यांनी संख्याबळाच्या खेळात शिवसेनेला साथ दिल्याने शिवसेनेनेही त्याची योग्य परतफेड केली होती. मंत्रिमंडळ स्थापन करताना गडाख यांच्याकडे मृदा आणि जलसंधारण मंत्रिपद देण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER