तिच्यासाठी मिलिंदने मिळवली सरकारी नोकरी

Milind Gawli

आपल्याला जी मुलगी आवडते तिच्यासाठी काहीही करण्याची ताकद प्रेमवीरांमध्ये कुठून येते याचे कोडे आजही कुणाला उलगडलेले नाही. वीस वर्षापूर्वी अभिनेता मिलिंद गवळी (Milind Gawli) याच्याबाबतीही असच काहीसं झालं आहे. आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्ध देशमुख या बिझनेसमनची भूमिका करणारा मिलिंद ऑनस्क्रीन जरी अरूंधतीला अंधारात ठेवून संजनाशी सूत जुळवत असला तरी त्याच्या खऱ्या आयुष्यातील अरूंधती अर्थात बायको दीपाच्या प्रेमासाठी त्याने रात्रंदिवस अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवली होती. अभिनयातच करिअर करण्याची गाठ बांधलेल्या मिलिंदने पहिल्या भेटीतच आवडलेल्या मुलीसाठी सरकारी नोकरी मिळवत तिच्याशी लग्नगाठही बांधली.

मिलिंद वयाच्या १७ व्या वर्षीच कॅमेऱ्यासमोर उभा राहिला. एका सिनेमाचे शूटिंग पाहण्यासाठी तो मित्रांसोबत गेला होता. त्यावेळी त्या सिनेमातील मुख्य कलाकार न आल्याने अभिनय येत असलेल्या मिलिंदकडे ही संधी चालून आली. तो सिनेमा होता हम बच्चे हिंदुस्थान के. या सिनेमाने त्या काळात चांगले यश मिळवले आणि मिलिंदचा रूपेरी पडद्यावरील प्रवास सुरू झाला. अभिनयक्षेत्रात त्याचा चांगला जम बसला. मराठी सिनेमा, नाटक यामुळे मिलिंदचा चाहतावर्गही वाढला. मूळचा नाशिकचा असलेला मिलिंद नातेवाईकांमधील एका लग्नासाठी जळगावला गेला होता. लग्नाच्या हॉलमधील गर्दीतील एका चेहऱ्यावर मिलिंदची नजर इतकी खिळली की लग्न करेन तर हिच्याशीच असा त्याने चंगच बांधला. त्या लग्नात आवडलेल्या मुलीची माहिती काढली आणि तिच्यापर्यंत पोहोचला. दीपाला जेव्हा त्याने प्रपोज केले तेव्हा तिने मिलिंदचे प्रपोजल स्वीकारले असले तरी खरी परीक्षा तर पुढेच होती. दीपाच्या वडीलांना, सरकारी नोकरी करणाराच जावई हवा होता आणि दीपा काही त्यांच्या वडीलांच्या शब्दाबाहेर जाणार नव्हती. पहिल्या नजरेत आवडलेल्या दीपाला मिळवण्यासाठी सरकारी नोकरी असायला हवी हे शिवधनुष्य पेलायचे कसे हा प्रश्न मिलिंदसमोर होताच. त्यावेळी मिलिंद फक्त सिनेमात अभिनय करत होता. त्यातून करिअरची गाडी फार काही रूळावर नव्हती. पण दीपाच्या प्रेमाने त्याला पुरतं वेडं केलं होतं. अभिनयाला थोडं बाजूला ठेवून मिलिंदने स्पर्धा परीक्षा द्यायला सुरूवात केली. त्याच वेळी ऑल इंडिया रेडिओवर कार्यक्रम अधिकारी या पदासाठी जाहीरात मिलिंदला दिसली आणि त्याने आकाशवाणीची परीक्षा दिली. अभिनयाक्षेत्रातील माहिती असल्याने त्याला ही परीक्षा पास व्हायला काहीच अवघड गेले नाही. मिलिंद कॅमेऱ्यासमोरून आकाशवाणीच्या स्टुडिओत आला. सरकारी नोकरी असलेला जावई हा टॅग घेऊन तो दीपाच्या वडीलांना भेटला आणि सासरेही खुश झाले. दीपासोबत मिलिंदचे लग्न झाले तेव्हा आपण दीपाला मिळवण्यासाठी पहिलं प्रेम असलेल्या अभिनयालाही काहीकाळ दूर ठेवले यावर खुद्द मिलिंदचाही विश्वास बसत नव्हता. लग्नानंतर मात्र मिलिंद सांसारीक जबाबदारी, आकाशवाणीची नोकरी यात इतका अडकून पडला की अभिनयापासून बरीच वर्षे लांब होता. दीपानेच त्याला पुन्हा त्याच्या आवडीच्या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन दिले. मिलिंद म्हणतो, सरकारी नोकरी करणारा मुलगा असला की मुलीची तिच्या वडीलांना काळजी नसते. दीपाच्या वडीलांचं हे मत बरोबरच होतं पण लग्नाला होकार मिळवायचा तर सरकारी नोकरीची अट पूर्ण करण्याशिवाय पर्याय नव्हता. मी अभिनयात पुन्हा यावं यासाठी दीपानेच तिच्या वडीलांचं मन वळवलं.

सध्या मिलिंद चर्चेत आहे तो आई कुठे काय करते या मालिकेमुळे. अरूंधतीसारखी समंजस बायको असूनही जुनी मैत्रीण असलेल्या संजनासोबत त्याचे मेतकूट सुरू आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेवरून अनेक प्रेक्षकांकडून त्याची कानउघाडणी करणारे मेसेज येत असतात. पण खऱ्या आयुष्यात मिलिंद हा बायको, मुलगी यांना खूप सन्मान देणारा पुरूष आहे. मिलिंदने त्याची मुलगी मिथिला हिलाही वाढवताना धीट बनवले आहे. ती तायक्वांदो, बॉक्सिंगमध्ये तरबेज आहे. घोडेस्वारीमध्ये माहीर आहे. कारड्रायव्हिंग अत्यंत सफाईदार आहे. आपल्या मुलीने कशातही कमी असू नये यासाठी त्याच्यातील वडील नेहमीच आग्रही असतो. मिलिंद गमतीने म्हणतो, आज जेव्हा मी एका मुलीचा बाप आहे तेव्हा मला समजू शकतं की दीपाच्या वडीलांनी तिच्यासाठी सरकारी नवरा असलेलाच मुलगा हवा ही अट का घातली असावी. मुलीला आयुष्यात स्थैर्य मिळावे हा दीपाच्या वडीलांचा विचार योग्यच होता.

ही बातमी पण वाचा : जोतिबासाठी विशाल एका आठवड्यात शिकला घोडेस्वारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER