माईक टायसनने ‘द ग्रेटेस्ट’ मुहम्मद अलींना हरवले….पण कसे?

वर्ल्ड बॉक्सिंग सुपर सिरीज ई टुर्नामेंटच्या लढतीने बॉक्सिंग प्रेमींचे स्वप्न पूर्ण

Mike Tyson beats Muhammed Ali on points in a thrilling eWBSS final

माईक टायसन व मुहम्मद अली..हेवीवेट बॉक्सिंगच्या इतिहासातील सर्वात सफल आणि महान खेळाडू! दोघेही वेगवेगळ्या कालखंडातील, त्यामुळे त्यांची लढत होण्याचा योग आला नाही पण हे दोन बॉक्सर जर एकमेकांशी लढले असते तर काय झाले असते? या दोघांमध्ये कुणी बाजी मारली असती, याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना नेहमीच आहे.

ही उत्सुकता हेरुनच गेमिंग कंपनी ‘इए’ ने रविवारीच एक व्हर्च्युअल इ- स्पोर्ट बॉक्सिंग स्पर्धा घेतली. वर्ल्ड बॉक्सिंग सुपर सिरीज ई टुर्नामेंट नावाच्या या स्पर्धेत जगातील आघाडीच्या खेळाडूंच्या व्हर्च्युअल सिमुलेशन लढती झाल्या आणि या स्पर्धेची अंतिम लढत माईक टायसन वि. मुहम्मद अली अशी स्वप्नवत झाली. वास्तवातही वर्ल्ड बॉक्सिंग सुपर सिरीज आठ खेळाडूंदरम्यान खेळली जाते.

वर्ल्ड बॉक्सिंग सुपर सिरीज ई टुर्नामेंटच्या या लढती फेसबूकवर थेट प्रक्षेपित करण्यात आल्या आणि सुमारे 8500 प्रेक्षकांनी या ड्रीम फँटसी लढतींचा आनंद घेतला.

वर्ल्ड बॉक्सिंग सुपर सिरीज ई टुर्नामेंटमध्ये बटरबीन व जाॕर्ज फोरमन यांना मात दिली तर मुहम्मद अली यांनी एव्हँडर हॉलीफिल्ड व सोनी लिस्टन यांना मात देत अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे अंतिम फेरीत ‘द ग्रेटेस्ट’ मुहम्मद अली विरुध्द ‘द बॕडेस्ट मॕन आॕन दी प्लॕनेट’ माईक टायसन अशी स्वप्नवत लढत झाली.

पहिल्या फेरीत अली यांनी टायसनला पकडून आपटले पण टायसन पुन्हा उठला आणि नेटाने लढला. दुसऱ्या फेरीत टायसनने उजव्या हाताने लगावलेल्या एका जोरदार ठोशाने अली यांना काही क्षणासाठी लोळवले. या फेरीत दोन्ही खेळाडू आश्चर्यकारक काही क्षणांसाठी नॉक कडाऊन झालेले दिसले.

पाचव्या फेरीपर्यंत अली यांनी आपल्या वेगवान फटक्यांआधारे नियंत्रण राखले पण त्यानंतर एका दणकेबाज लेफ्ट हूकने अली यांना डळमळित केले. पाठोपाठ उजवीकडून ठोसा आला आणि एक आॕल टाईम क्लासिक लढत बघत असल्याचा अनुभव प्रेक्षकांना आला. दोन्ही खेळाडू लढत लांबवत राहिले आणि शेवटी 12 फेऱ्याअंती माईक टायसनला 114 विरुध्द 111 अशी फक्त तीन गूणांनी विजयश्री मिळाली.

या निकालावर मुहम्मद अली नाराज दिसले तर टायसनने विजयी मुद्रेत हात उंचावले. योगायोग म्हणजे ज्या बॉक्सरला हरवले त्याच मुहम्मद अली यांच्या नावाने असलेली इ-अली ट्रॉफी टायसनला बक्षिसात मिळाली. मात्र प्रेक्षकांनातर इ- बॉक्सिंगच खरे विजेते असल्याचे वाटले. आता हीच लढत पुन्हा व्हावी अशी चाहत्यांची इच्छा आहे पण नियोजनानुसार विजेत्या टायसनचा चॕलेंजर आता इ- डेव्ह अॕलन असेल.