मायकेल स्लेटरची ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांवर आगपाखड, म्हणाला आमची पर्वाच नाही!

Michael Slater - Scott Morrison - Maharashtra Today

कोरोनामुळे (CORONA) ठिकठिकाणच्या लॉकडाऊन व निर्बंधांमुळे ताणतणाव वाढत असून लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतात सुरू असलेल्या आयपीएलमध्ये (IPL) खेळत असलेले परदेशी क्रिकेटपटू, विशेषत: ऑस्ट्रेलियाचे खेळाडू असेच अडचणीत आले असून त्यांच्या मायदेशी परतण्याच्या वाटा बंद झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियन (Australia) सरकारने बाहेरच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांना आपल्या वाटा बंद केल्या आहेत आणि भारतात दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ घालवणारे ऑस्ट्रेलियात परतले तर त्यांना तुरुंगवास किंवा ५० हजार डॉलरचा दंड करण्यात येणार आहे. शिवाय ऑस्ट्रेलियन खेळाडूंची मायदेशी परतण्याची व्यवस्था करण्याची मागणीसुध्दा ऑस्ट्रेलियन सरकारने फेटाळून लावली आहे. त्यामुळे माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायेकल स्लेटरच्या (Michael Slater) संतापाचा उद्रेक झाला असून त्याने ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) यांच्यावर चांगलीच आगपाखड केली आहे.

आपली तीव्र नाराजी व्यक्त करणाऱ्या ट्वीटमध्ये स्लेटरने म्हटलेय की, जर आमच्या सरकारला ऑस्ट्रेलियन नागिरकांच्या सुरक्षेची पर्वा असती तर त्यांनी आम्हाला मायदेशी परतू दिले असते. मात्र जे काही चाललेय ते लाजिरवाणे आहे. पंतप्रधान, तुमचे हात रक्ताळलेले आहेत. आम्हाला अशी वागणूक देण्याची तुमची हिंमतच कशी झाली? क्वारंटीनची पध्दती ठरविण्याबाबत काय? आयपीएलमध्ये काम करण्यासाठी मी सरकारची परवानगी घेतली होती आणि आता त्याच सरकारने मला वाऱ्यावर सोडून दिले आहे.

ही आगपाखड करणाऱ्या मायकेल स्लेटरने आता भारत सोडून मालदीवमध्ये प्रयाण केले आहे आणि इतर काही खेळाडूसुध्दा त्याच मार्गावर आहेत.

मुंबई इंडियन्ससाठी खेळणाऱ्या ख्रीस लीन याने ऑस्ट्रेलियन सरकारला विनंती केली होती की आयपीएल संपल्यानंतर त्यांच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली जावी पण मॉरिसन यांनी हे खेळाडू व्यक्तीगत पातळीवर गेलेले असल्याने सरकारला अशी कोणतीही व्यवस्था करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ नीक हॉकले यांनीसुद्धा अशीच भूमिका घेतली आहे.

ही आगपाखड केल्यानंतर स्लेटर उलट सोशी मीडियावर ट्रोल झाला आहे आणि त्याने आरोग्य व सुरक्षेपेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याची टीका होत आहे परंतु आपण आयपीएल सोडून मध्येच भारताबाहेर पडलो असल्याने आपल्याला काहीच मिळाले नसल्याचे स्लेटरने स्पष्ट केले आहे. स्लेटरने म्हटलेय की पैशांसाठी हे सर्व केले असे ज्यांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे. माझ्या कमाईचे हेच साधन आहे पण मी मध्येच सोडून निघाल्याने मला एक पैसासुध्दा मिळालेला नाही. त्यामुळे कृपया अपप्रचार थांबवा आणि भारतात दररोज मरणाऱ्या हजारो लोकांचा विचार करा. सहानूभूती ज्याला म्हणतात ती आमच्या सरकारकडे असेल तर…!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button