झाले भाऊ झाले, मायकल जॅक्सन शोचे शुल्क माफ झाले बघा काय होते हे प्रकरण!

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि भाजपचे दिग्गज नेते प्रमोद महाजन (Pramod Mahajan) या दोन शिल्पकारांनी १९९५ मध्ये शिवसेना-भाजप (Shivsena -BJP) युतीचे सरकार राज्यात आणून दाखविले. राज्यातील ते केवळ दुसरे गैरकाँग्रेसी सरकार होते. एक दिवस कलासक्त बाळासाहेबांच्या मनात असे आले की जगविख्यात पॉपस्टार मायकेल जॅक्सन (Michael Jackson) याला मुंबईत नाचवायचेच. झाले यंत्रणा कामाला लागली.

आजच्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यावेळी शिवसेनेत होते आणि अत्यंत सक्रिय होते. बाळासाहेबांचे पुत्र आणि आजचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज यांच्याइतके सक्रिय नव्हते. अर्थातच मायकेल जॅक्सनला मुंबई आणून त्याची कॉन्सर्ट आयोजित करण्याची जबाबदारी राज ठाकरे यांनी आपल्या शिरावर घेतली. शेवटी तो दिवस उजाडला. १ नोव्हेंबर १९९६ रोजी मायकल जॅक्सनच्या नृत्यावर मुंबई थिरकली.

राज यांचे एक अपत्य होते, शिव उद्योग सेना. मराठी तरुणांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी काढलेली ही संघटना होती. त्या सेनेतर्फे ही कॉन्सर्ट आयोजित केली गेली. त्यातून आलेली रक्कम शिवउद्योग सेनेच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी खर्ची पडेल असे वाटले होते पण पुढे त्याचे नेमके काय झाले याची माहिती नाही. कॉन्सर्ट दणदणीतच झाली. मायकेल जॅक्सन हा बाळासाहेबांना मातोश्रीवर जावून भेटला.

पुढे या कॉन्सर्टवर ३ कोटी ३३ लाख ७६ हजार रुपये इतके करमणूक शुल्क आकारण्याचा आदेश राज्याच्या महसूल विभागाने काढला. हा आदेश काढणारा अधिकारी आयएएस होता आणि आज तो राज्य शासनाच्या सेवेत मोठ्या पदावर आहे. या आदेशाने खळबळ उडाली. हा आदेश आपले सरकार असताना निघालाच कसा यावरून गहजब झाला. कॉन्सर्टचे आयोजक विझक्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला अखेर ते शुल्क माफ करण्यात आले. मात्र, मुंबई ग्राहक पंचायतने या शुल्कमाफीविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने ती रक्कम न्यायालयाकडे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार कंपनीने ती जमादेखील केली.

पुढे सत्तांतर झाले. १५ वर्षे आघाडी सरकार सत्तेत राहिले. नंतर देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री झाले. तेव्हा हा विषय आला नाही पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर या विषयाने पुन्हा डोके वर काढले. विझक्राफ्ट कंपनीला ३ कोटी ३३ लाख ७६ हजार रुपयांचे करमणूक शुल्क माफ करण्याचा निर्णय ६ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आज त्याची अंमलबजावणी करणारा आदेश महसूल विभागाने काढला. ‘ पॉप म्युझिकचा उगम रॉक अँड रोल या संगीत प्रकारातून झालेला आहे. तर बीट म्युझिकमध्ये रॉक अँड रोल संगीत प्रकाराच्या स्टाईलचा समावेश आहे.

त्यामुळे पॉप म्युझिक व बीट म्युझिक हे दोन्ही संगीतप्रकार एकमेकांशी सुसंगत आहेत. त्यावरून मायकल जॅक्सनचा शो हा संगीतप्रकार बीट म्युझिकचाच भाग असल्याचे दिसून येते. तसे मायकल जॅक्सनचा पॉप शो हा संगीताचा प्रकार कॅब्रे अथवा बॉल डान्स या संगीत नृत्याच्या प्रकारात मोडत नाही. मायकल जॅक्सनच्या त्या शोमध्ये बॉल डान्स वा कॅबरे नृत्य प्रकाराचा समावेश नसल्याने शासनाच्या पूर्वीपासूनच्या निर्णयानुसार हा कार्यक्रम करमणूक शुल्कमाफीस पात्र ठरतो’ असे समर्थन राज्य शासनाने आजच्या आदेशात केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER