मेट्रोचे कारशेड : कांजूरमार्गची जागा आहे कोर्ट-कचेरीच्या वादात अडकलेली – भातखळकर

Atul Bhatkhalkar - CM Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित करताना मेट्रो तीन प्रकल्पाच्या कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय जाहीर केला. मेट्रो प्रकल्पासाठी कारशेड आता आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर बांधण्यात येणार आहे, असे ते म्हणालेत. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयावर कांदिवली पूर्वचे भाजपाचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.

भातखळकर म्हणालेत – मेट्रो कार शेड कांजूरला नेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा फसवी आहे. ही जमीन कोर्टकज्ज्यात अडकलेली आहे. मुंबईत कारशेडसाठी फक्त आरेची जमीन उपयुक्त असल्याचा तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल असताना ही उठाठेव कशाला?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र-मुंबईतील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की, त्यांच्या सरकारने नियुक्त केलेल्या समितीनेच मेट्रो प्रकल्पासाठी कारशेड आरे कॉलनीच्या जागेवरच होऊ शकते असे म्हटले होते, त्याशिवाय आमच्या सरकारच्या काळात नियुक्त केलेल्या समितीनेही कारशेडसाठी आरे कॉलनीची निवड केली होती, असे अतुल भातखळकर यांनी सांगितले.

रोज पाच कोटींचे नुकसान
कांजूरमार्गची जमीन कोर्टकचेरीच्या वादात फसलेली आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी खोटं बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. मेट्रो कारशेडच्या कामाला मागच्या नऊ महिन्यांपासून स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे मुंबई-महाराष्ट्रातील जनतेचे दिवसाला पाच कोटी रुपयांचे नुकसान होते आहे. अशी खोटी विधाने केल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचा निषेध करतो, असे अतुल भातखळकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER