मेस्सी विरुद्ध रोनाल्डो… लढत जी झालीच नाही!

लियोनेल मेस्सी (Lionel Messi) व ख्रिस्तियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo) हे कट्टर प्रतिस्पर्धी इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर यंदा एकाच सामन्यात खेळताना दिसतील अशी शक्यता होती. चॅम्पियन्स लीगसाठी (Champions League) रोनाल्डोचा युवेंटस (Juventus) संघ आणि मेस्सीचा बार्सिलोना (Barcelona) संघ यांच्यात ‘जी’ गटाच्या  साखळी फेरीतच सामना आला आणि त्यामुळे रोनाल्डो व मेस्सी हे पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीगच्या साखळीत आमने-सामने येतील असे गृहीत मानले जात होते; परंतु नियतीला ते मंजूर नव्हते म्हणून नेमका या सामन्याच्या काही दिवस आधी रोनाल्डो कोरोना पॉझिटिव्ह आला आणि बुधवारी तो या सामन्यात खेळू शकला नाही.

त्यामुळे मेस्सी वि. रोनाल्डो या द्वंद्वाकडे डोळे लावून बसलेल्या फुटबॉलप्रेमींची निराशा झाली. नेमका या सामन्यात मेस्सीने गोल केला आणि त्याचा संघ बार्सिलोनाने हा सामना २-० असा जिंकला. दुर्दैवाने रोनाल्डोवर घरी बसून आपल्या संघाचा पराभव पाहण्याची वेळ आली. उस्मान डॉबेलेचा गोल आणि मेस्सीने पेनल्टीवर साधलेली संधी यामुळे बार्सिलोनाचा संघ युवेंटसला भारी पडला. गेल्या दोन वर्षांत  मेस्सी व रोनाल्डो एकदाही आमने-सामने आले नव्हते. त्यामुळे  चॅम्पियन्स  लीगच्या ड्राॕमध्ये त्यांच्या संघांची लढत साखळी फेरीतच होणार हे स्पष्ट होताच जगभरातील त्यांचे चाहते या लढतीकडे डोळा लावून बसले होते. मात्र कोरोनाने घोळ केला.

चॅम्पियन्स  लीगचे नियंत्रण करणारी संस्था ‘यूईएफए’च्या नियमानुसार कोणताही सामना सुरू होण्याच्या २४ तास आधी खेळाडूने त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल दिला तरच त्या कोरोनाबाधित राहिलेल्या खेळाडूला सामना खेळायची परवानगी दिली जाते. रोनाल्डो ही अट पूर्ण करू शकला नाही; मात्र त्याने सोशल मीडियावर आपण फीट व फाईन असल्याची पोस्ट टाकली आहे.

या सामन्यात अल्वारो मोराटा याने तीन वेळा गोल केले पण तिन्ही वेळा आॕफसाईड ठरल्याने त्याचे हे गोल बाद ठरले. रोनाल्डोच्या अनुपस्थितीत युवेंटसचा संघ या सामन्यात अगदीच फिका पडला. आता डिसेंबरमध्ये या दोन्ही संघांचा पुन्हा सामना होईल त्यावेळी तरी रोनाल्डो व मेस्सीचा सामना बघायला मिळेल याकडे आता त्यांचे चाहते डोळे लावून बसले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER