मेस्सीने बार्सिलोना क्लब सोडला तर मिळेल घबाड!

Messi

सुप्रसिध्द फूटबॉलपटू लियोनेल मेस्सी (Lionel Messi) हा एफ.सी.बार्सिलोना क्लब सोडून दुसरीकडे जाणार असल्याची चर्चा आहे. मेस्सीसारख्या दमदार खेळाडूला कोणता क्लब आपल्याकडे ओढतो आणि त्यासाठी किती रक्कम मोजतो याची प्रचंड उत्सुकता आहे. या दोन्ही गोष्टी गुलदस्त्यात असल्या तरी यात पैशांची प्रचंड उलाढाल होईल हे मात्र निश्चित.

यासांदर्भात एक माहिती समोर आली आहे. त्यानुसार इंटर मिलान क्लब (Inter Milan Club) मेस्सीला करारबध्द करण्यास उत्सुक आहे. आणि मेस्सी जर त्यांच्याकडे गेला तर त्याला इंटर मिलानकडून चार वर्षांसाठी तब्बल 26 कोटी (26 Million) युरो एवाढी तगडी रक्कम मिळेल असा अंदाज आहे.

एफसी बार्सिलोनासोबत (Barcelona) मेस्सीचा करार पुढील वर्षापर्यंत आहे. सहा वेळचा बॕलन डी ओर विजेता मेस्सी हा यंदाच्या बार्सिलोना क्लबच्या कामगिरीवर नाराज आहे. हा संघ कमजोर असुन त्यांच्या कामगिरीत सातत्य नसल्याची नाराजी त्याने स्पष्ट बोलून दाखवली आहे. यंदाच्या मोसमात ला लिगामध्ये बार्सिलोनाचा संघ विजेतेपदाबाबत इंटर मिलानला फिका पडला आहे. या 33 वर्षीय सुपरस्टार खेळाडूची बार्सिलोना संघव्यवस्थापनावरसुध्दा नाराजी आहे.

इंटर मिलान क्लबचे मेस्सीशी चांगले संबंध असून त्याला 2021 मध्ये आपल्या संघात खेचण्यास यश मिळेल अशी त्यांना आशा आहे. हा बदल करताना ट्रान्सफर फी लागणार नसली तरी इंटर कडून मेस्सीला चार वर्षांच्या कराराचा प्रस्ताव दिला जाण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी वर्षाकाठी मेस्सीला किमान 5 कोटी युरो मिळतील असे गणित मांडले जात आहे. या गणितानुसार मेस्सी हा ख्रिस्तियानो रोनाल्डोपेक्षाही महागडा खेळाडू ठरणार आहे. रोनाल्डोला युवेंटस क्लबकडून सध्या वर्षाला 3 कोटी 10 लाख युरो मिळतात.

मेस्सीच्या क्लब बदलासंदर्भात इंटर मिलानचे अध्यक्ष स्टिव्हन झँग यांनी मेस्सिचे प्रतिनिधी व बार्सिलोनाचे अध्यक्ष जोसेफ मारिया बार्तोमी यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. इंटरने आतापासूनच मेस्सीचा त्यांच्या संघातर्फे प्रचार करायला सुरुवात केली आहे. नापोलीविरुध्दच्या त्यांच्या सामन्याआधी त्यांनी प्रसिध्द डुओमो कॕथेड्रलच्या परिसरात मेस्सीची छबी झळकावली होती.

इंटर मिलानने प्रयत्न चालविले असले तर अंतिम निर्णय मेस्सीचाच राहणार आहे. मात्र मेस्सीने अद्याप यासंदर्भात कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. त्याचा प्रतिस्पर्धी रोनाल्डोने त्याला आपल्यासोबत म्हणजे युवेंटसतर्फे खेळायचे आधीच आव्हान दिले आहे. याआधी मेस्सीने एकाच क्लबसाठी खेळत आपली कारकिर्द पार पडावी अशी इच्छा प्रदर्शित केली होती पण आता परिस्थिती बदलली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER