मेस्सीची कोरी पाटी पुसली गेलली, बार्सिलोनासाठी मिळाले पहिले ‘रेड कार्ड’

Messi opened red card account for Barcelona

लियोनेल मेस्सीसाठी (Lionel Messi) आतापर्यंत घडली नव्हती अशी गोष्ट घडली. बार्सिलोना (Barcelona) क्लबसाठी खेळताना कारकिर्दीत प्रथमच त्याला रेड कार्ड (Red Card) मिळाले आणि एरवी निष्कलंक राहिलेल्या मेस्सीच्या कारकिर्दीला गालबोट लागले. स्पॕनिश सुपर कपच्या (Spanish Super Cup) अंतिम सामन्यात रविवारी मेस्सीबाबत ही नकोशी गोष्ट घडली. जखमेवर मीठ म्हणजे अॕथलेटीक बिल्बाओविरुध्दचा हा सामना बार्सिलोनाने गमावला.

अर्जेंटिनासाठी खेळताना मेस्सीला रेड कार्ड मिळाले आहेत पण बार्सिलोनाकडून तब्बल 753 सामने खेळताना आतापर्यंत त्याला एकदाही हे कार्ड मिळालेले नव्हते. अर्थात ते मिळावे अशी कुणाची इच्छासुध्दा नसते.

स्पॕनिश सुपर कपच्या या सामन्यात सेव्हिल येथे अंतोईन ग्रीझमानच्या गोलांआधारे बार्सिलोनाचा संघ दोन वेळा आघाडीवर होता पण आॕस्कर डी मार्कोस व व्हिलालिब्रे यांनी अॕथलेटीकसाठी दोन्ही वेळा बरोबरी केल्यावर इनाकी विल्यम्सने विजयी गोल केला.

सामन्यातील 120 व्या मिनीटाला व्हिलालिब्रेकडे मेस्सी धावून गेला आणि लाथ मारली.रेफरीच्या लक्षात हा प्रकार आला नाही पण व्हीएआरमध्ये मेस्सी पकडला गेला आणि रेड कार्डची त्याची कोरी पाटी पुसली गेली.

33 वर्षिय मेस्सीला याच्याआधी दोन वेळा रेड कार्ड मिळाले होते पण दोन्ही वेळा त्याचा राष्ट्रीय संघ अर्जेंटिनासाठी खेळताना ही कारवाई झाली होती. आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात 2005 मध्ये हंगेरीविरुध्द आणि 2019 मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेच्या तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात चिलीविरुध्द त्याला रेड कार्ड मिळालेले आहे. आता बार्सिलोनासाठी मिळालेल्या या पहिल्या रेड कार्डमुळे तो पुढच्या किमान चार स्थानिक सामन्यांत खेळू शकणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER