“संदेसे आते है !”

Postman

“मोबाईल खिशात व्हायब्रेट होतो ,पण गदगदून हलवू शकतात ती पत्र.!”.. पत्रासाठीचा मनातला हळवा कप्पा व्यक्त करताना श्री. अरविंद जगताप प्रसिद्ध कवी आणि पटकथा लेखक यांचे हे शब्द खरोखरच प्रत्येकाला पटणारे आहे. जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकालाच या पत्राचं आपल्याशी असणारा नातं आठवेल .अर्थात साधारण 1999 पर्यंत लोकांसाठी पत्र महत्त्वाची होती .नंतर मोबाईल ,इमेल्स यांचे जग सुरू झालं .पण पत्र लिहिण्याची जी मजा होती ती आता ई-मेलमध्ये नाही. पत्राचे वाचन आणि लिखाणही घरामध्ये सगळ्यांनी मिळून होत असे. तो एक सोहळा होता.

म्हणूनच पत्राशी खास नाते असणारे जगताप म्हणतात ,”रात्री झोपताना थंड दूध पीत जा, माझ्यासाठी तपकिरीची डबी आणायला सांग ,असं करता-करता थांबून आजी सांगायची .तुम्हाला आठवतंय असा मेल तुम्ही कधी लिहिले सगळ्यांनी मिळून ? कधीतरी तंत्रज्ञान बल्ब समोर रॉकेल लावून लटकलेल्या कागदासारखा वाटतं . यांसारखे आपण सगळेच झेप घेतो ते कागदाच्या दिशेने आणि नष्ट करतोय अस्तित्व अशी भीती वाटते!”खरोखरच त्यांचं असलेलं पत्रावरती प्रेम आणि तंत्रज्ञाना संबंधी चे वर्णन अतिशय मार्मिक आहे.खूप सुंदर उपमा दिली आहे त्यांनी !

(तंत्रज्ञाना संबंधीची त्यांची कल्पना कदाचित आत्ताच्या पिढीला माहीत नसेल. पूर्वी बल्ब भोवती किडे यायचे, अशावेळी तेल लावलेला कागद बल्बला लटकवून ठेवलेला असायचा. किडे प्रकाशाच्या दिशेने झेप घेत आणि तेल लावलेल्या कागदाला चिटकून बसत, मरत असत अशी ती कल्पना)

आणि हो ! कालिदासाचं मेघदूत. ते तर विसरता येणार नाहीच या संदर्भात ! एका यक्ष्याने आपल्या पत्नीसाठी दिलेला तो संदेश. प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांनी मेघदूत शिकत असतानाचा त्यांचा स्वतःचा अनुभव खूप सुंदर वर्णन केला आहे. त्यांनी लिहिले आहे,”कॉलेज नुकतेच सुरू झाले होते .आणि प्रिन्सिपल करमरकरांनी वर्गात मेघदूत शिकवायला सुरुवात केली .बाहेर तुफान पाऊस पडत असे .बाहेरच्या पटांगणात गच्च हिरवळ दाटलेली असे .झाडातून पावसाचे टपोरे थेंब टपटप खाली गळत. अशा या या सुंदर वातावरणात कालिदासाचे ते अमर काव्य ऐकले ,समजावून घेतले ,बाहेरच्या पावसाशी कालिदासाच्या शब्दाचित्रांनी एक सहज संवाद साधला .आणि मेघदूत पावसासकट मनात झिरपत राहिला !

त्या पुढे म्हणतात ,”की पर्वत शिखरांना आलिंगन देणारा ,किल्ल्यांच्या बुरुजावर टक्कर द्यायला सिद्ध झालेल्या हत्तीसारखा वाटणारा तो मेघ, त्या जांभळाच्या घनदाट बागा, गावाबाहेरच्या उद्यानातील जूईची फुले खुडणाऱ्या त्या माळणी ,मेघा कडे आपले चकित डोळे लावणाऱ्या शालीन ग्रामवधू ,नुसत्या नांगरलेल्या शेताचा दरवळणारा उन्मादक वास ….आणि यक्षाने आपल्या विरही पत्नीसाठी मेघा जवळ दिलेला तो प्रेम संदेश !

“वा ! काय मस्त वर्णन केलय शांताबाईंनी ! म्हणूनच “मेघदूत “त्यांना जेवढ भावलं तेवढच आपल्याही मनावर हिरवेंगार आणि टवटवीत असं गारुड त्यांन केलं! असो तर असा संदेश असो की पत्र ! त्याची मजा काही वेगळीच!

पत्र आले की एकदा वाचायचं मग उशीखाली ठेवून निवांत पणे परत परत वाचायचं ! अशीच पत्र वाचनाची पध्यत होती .तेव्हाची परिस्थिती सगळ्यांचीच खूप बेताची होती. त्यामुळे शिक्षणासाठी घराबाहेर राहिलेल्या मुलाचे पत्र आल्यावर भविष्यातील सुखाच्या आशेने ,आई-वडील परत कष्टासाठी उठून उभी राहत. तर आई-वडिलांना काळजी नको ,म्हणून अनेक बाहेर शिकणारी मुले उपाशीपोटी ,बिनापुस्तकांचा अभ्यास करत असूनही ही आपली खुशाली पत्रातून आई-वडिलांना सांगत.

कित्येक सैनिकांच्या बायकांना केवळ पत्राच्या आशेवर जगण्याचे बळ मिळते. तर “संदेसे आते है” त्याची वाट बघून बॉर्डरवर ,घरची मिळालेली खुशाली सैनिकांना मायेची ऊब देत राहते. नव्याने लग्न ठरलेल्या मुलीच्या भावी पतीच्या आलेल्या पत्रातले एक वाक्य अंगावर शहारा आणू शकते. खरंतर पत्र ही खाजगी गोष्ट .एकट्याने वाचण्याची ,एकट्याने लिहिण्याची !

सासरच्या मुलीची खुशाली कळली की आई निश्चिंत होई आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येत, उलट माहेरच्या पत्राने सासुरवाशिणीला माहेरची आठवण येऊन नकळत डोळ्यांच्या कडा पाणावत. कारण आतासारखे सकाळ ,दुपार, संध्याकाळ “आई ,भाजीचा रस्सा फारच पातळ झाला, आता काय करू ?”असे फोन शक्य नव्हते. त्यामुळे आईलाही अंतर्देशीय पत्र कमी पडत असे. मग बारीक बारीक अक्षरात ता.क. (म्हणजे ताजा कलम ही पूर्वीची पद्धत होती. जास्तीचं काही आठवलं ही असे लिहीत असत) लिहीत आडवा ,तिरका ,कोपऱ्यात असा मजकूर भरभरून ओसंडून वाहत होता. नाही !अशी ही पोटची माया भरून वहायची !

फ्रेंड्स ! खरंतर संवाद ही माणसाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे .माणसाच्या मूलभूत गरजा ,अन्न वस्त्र ,निवारा असल्या तरीही ,”आपले म्हणणे कुणीतरी ऐकून घ्यावे “ही माणसाची सर्वात मोठी गरज आहे. एकाकीपणाची भावना अत्यंत त्रासदायक असते. आज दररोज उठून दहा-पंधरा व्हाट्सअप ग्रुप आणि त्याच्यावरचे गुड मॉर्निंग ,गुड नाईट चे मेसेजेस ही गरज पूर्ण करू शकत नाही. फक्त अंगठे व इमोजी यांनी व्यक्त केलेल्या “एका छापाच्या “भावना आपुलकीची भूक भागवत नाहीत. खरंतर मनातल्या गुढ भावनांपासून ते क्षणिक लहरी भावनांना श्रोता हवा असं प्रत्येकालाच वाटतं . प्रत्येक कलाकार देखील आपल्या आपल्या कलेतून व्यक्त च होत असतो.

जन्माला आलेलं बाळ’ टेई ‘करून रडतो, तो जन्मल्याबरोबर चा संवाद असतो .त्याला काही सांगायचं असतं आणि मला कोणी ऐकून घ्या ही त्याची विनवणी असते. आईच्या उबदार पोटातून बाहेरच्या तीव्र प्रकाशात ,प्रचंड आवाजात गांगरलेले ते बालक आपलं दुःख सांगतो असे मानसशास्त्रज्ञ सांगतात.

संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे ,त्यात कवी जे म्हणतो त्याचा साधारण मतितार्थ असा, की “माझ्या काव्याचे मर्म कुणाला कळत नाही. जाणकार रसिक आहेत ,पण मत्सरी आहेत. धनिक आश्रयदाते आहेत,पण पक्षपाती आहेत, सामान्य जन बिचारे अज्ञानाने गारद झालेले असल्याने माझे काव्य माझ्यातच जिरून जावो !

“पण गंमत अशी आहे की ,”या जगात विटलेल्या या कवीने मला माझे काव्य प्रकट करायचे नाही “हा आपला निर्धार शेवटी काव्य करूनच प्रकट केला आहे. असा संदर्भ आढळतो.

एकूणच काय तर परस्परांशी संवाद साधणे ,तो सुसंवाद असणे ही अत्यंत निकडीची गरज असल्याची जाणीव होते आहे. सध्याच्या कोरोना काळात तर याची प्रकर्षाने जाणीव झाली. अगदी पाच सहा महिने कुणी कुणाकडे करण्याशिवाय फारस जात येत नाही.त्यामुळे प्रत्येक मन नातलगांच्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीसाठी आसुसलेली आहे. तसं म्हणाल तर प्रत्येकाला घरात काय कमी आहे? पण तरीही ही उत्सुकता मात्र कायम आहे. याला कारण म्हणजे प्रत्येकाची व्यक्त होण्याची गरज, कुणाशी तरी बोलावसं वाटणे.

फक्त प्रश्न असा आहे की, प्रत्येकालाच आपल्या कथा ,व्यथा ऐकवाव्याशा वाटतात . मग ऐकायचे कोणी ? उत्कृष्ट श्रोता होणं आणि मिळणं खूप गरजेचं झालंय. फोनही आला तरी बरेचदा बोलण्याच अक्षरशः तुंबळ युद्ध होतं. म्हणूनच मला आत्ता जाणवतंय की दोन्हीकडून पत्र लिहिली गेली तर आपण निदान निवांत वाचू तरी शकू ! म्हणजे समोरच्याचा नीट श्रोता तरी होऊ शकू ना ! दोन्हीकडच्या भावना नीट समजून तर घेतल्या जातील. मुख्य आणखीन एक फायदा दिसतो की ,प्रत्यक्ष बोलतांना बरेचदा भावना खूप तीव्र असतात त्यामुळे त्या प्रतिक्रियांच्या वळणावर जातात. मात्र लिहून कळवलेल्या भावना , मधे थोडा वेळ गेल्याने प्रतिसादाच्या पातळीवर जातात.

चला तर मग ! सज्ज व्हा !! आणि लिहा पत्र !!!

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER