मेलानिया ट्रम्प दिल्लीतील सरकारी शाळेत; घेतला नृत्याचा आनंद!

नवी दिल्ली :- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ मेलानिया ट्रम्प यांनी आज मंगळवारी दिल्लीतील एका सरकारी शाळेला भेट दिली. या भेटीत त्यांनी दिल्ली सरकारच्या ‘हॅप्पीनेस क्लास’ या उपक्रमाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या नृत्याचा आनंद घेतला.

घुसखोर म्हणून पकडलेले निघाले भारतीय; मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल

दिल्लीतील नानकपुरा येथील सर्वोदय सेकंडरी स्कूलमध्ये मेलानिया यांचे आगमन होताच, पारंपरिक वेषभूषेतील विद्यार्थिनींनी त्यांना ओवाळले. त्यानंतर मेलानिया यांनी ‘हॅप्पीनेस क्लास’मधील हसत-खेळत शिक्षणाची संकल्पना समजून घेतली. यावेळी मेलानिया यांच्या स्वागताचा संदेश वर्गातील फळ्यावर लिहिण्यात आला होता. मेलानिया यांच्या भेटीपूर्वी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका ट्विटद्वारे दिल्लीतील नागरिकांचे अभिनंदन केले. मेलानिया ट्रम्प या दिल्लीतील सरकारी शाळेस भेट देत असल्याचा आपल्याला आनंद होत आहे. त्या येथून विशिष्ट संदेश घेऊन जातील, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कुटुंबीयांसह रात्री ९.३०च्या सुमारास इंदिरा गांधी आतंरराष्ट्रीय विमानतळावर पोहचतील. त्यानंतर ते जर्मनीमार्गे अमेरिकेस रवाना होतील.