
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन बुधवारी पुन्हा एकदा राजकीय नाट्य घडले. माजी अध्यक्ष मेघराज भोसले (Meghraj Bhosale) यांच्यावर मनमानी आणि घटनाबाह्य कामकाजाचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध बंड पुकारलेल्या त्या आठ संचालकांमध्ये अध्यक्षपदावरुन एकमत झाले नाही. ‘त्या’ आठ संचालकापैकी अभिनेत्री वर्षा ऊसगावकर आणि अभिनेता सुशांत शेलार हे दोघेही अध्यक्षपदाच्या चर्चेत होते. अध्यक्षपदासाठी त्यांच्यामध्ये एकमत झाले नाही. यामुळे अध्यक्षपदासाठी आग्रही असणारे अभिनेता सुशांत शेलार व निकिता मोघे यांनी अचानकपणे मेघराज भोसले यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आणि गेले पंधरा दिवस रंगलेल्या महामंडळाच्या राजकारणात मेघराज भोसले यांनी बाजी मारली. सुशांत शेलार, निकिता मोघे यांनी केलेले घूमजाव महामंडळात चर्चेचा विषय ठरले आहे.
कुरघोडी, शह-काटशहाचे खेळी आणि राजकीय डावपेच आखत महामंडळाच्या संचालकांनी राजकारण्यांनाही लाजविले, शिवाय राजकारणात ‘हम भी कुछ कम नही’ दाखवून दिले. पंधरा दिवसापूर्वी एकमेकांच्या विरोधात टीका करणारे बुधवारी पुन्हा एकमेकांच्या गळयात गळे घालतानाचे चित्र पाहावयास मिळाल्याच्या प्रतिक्रिया चित्रपट व्यावसायिकांतून उमटत आहेत. २६ नोव्हेंबर रोजी मेघराज भोसले यांच्या विरोधात मांडलेला अविश्वास ठराव बुधवारी, नऊ डिसेंबर रोजी झालेल्या सभेत सात विरुद्ध सहा मतांनी नामंजूर झाला. भोसले यांच्यावरील अविश्वास ठराव नामंजूर झाल्यामुळे त्यांचे अध्यक्षपद कायम आहे असा निर्वाळा महामंडळाच्या वकिलांनी दिला.
चित्रपट महामंडळाच्या संचालक मंडळाची २६ नोव्हेंबर रोजी बैठक झाली होती. त्या बैठकीत महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, कार्यवाह सुशांत शेलार, संचालक वर्षा ऊसगावकर, संचालक व दिग्दर्शक सतीश रणदिवे, पितांबर काळे, रणजित जाधव, सतीश बीडकर आणि निकिता मोघे यांनी तत्कालिन अध्यक्ष मेघराज भोसले यांच्याविरोधात अविश्वाचा ठराव मांडला. आठ विरुद्ध चार मतांनी हा ठराव मंजूर झाला. त्या बैठकीत भोसले यांच्या बाजूने खजानिस संजय ठुबे, सहखजानिस शरद चव्हाण, संचालक विजय खोचीकर, चैत्राली डोंगरे यांनी मतदान केले. तर मेघराज भोसले यांनी महामंडळाच्या घटनेत अविश्वास ठरावाची तरतूद नाही. त्या आठ संचालकांनी केलेला ठराव बेकायदेशीर आहे. त्या विरोधात कोर्टात दाद मागू. शिवाय राजीनामा देणार नाही असा पवित्रा घेतला होता.
दरम्यान त्या आठ संचालकांनी महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाचा तात्पुरता कार्यभार सोपविला. नवीन अध्यक्ष निवडीसाठी नऊ डिसेंबर रोजी संचालक मंडळाची मुंबईत बैठक बोलावली होती.
अध्यक्षपदावरुन बिनसले
मेघराज भोसले यांच्या विरोधात त्या आठ संचालकांनी एकत्र येऊन मोट बांधली होती. दरम्यान महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी दिग्दर्शक सतीश रणदिवे, अभिनेत्री वर्षा ऊसगावकर, अभिनेता सुशांत शेलार यांची नावे चर्चेत होती. दरम्यान दोन दिवसापूर्वी सतीश रणदिवे यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाजूला झाले. दरम्यान महामंडळाच्या आजवरच्या इतिहासात एकही महिला अध्यक्ष झाल्या नाहीत. तेव्हा अभिनेत्री वर्षा ऊसगावकर यांना अध्यक्षपदी संधी देऊ असा प्रस्ताव रणदिवे व पितांबर काळे यांनी मांडला. अन्य संचालकही त्याच्याशी सहमत होते. दरम्यान हा प्रस्ताव अभिनेता सुशांत शेलार यांना मान्य झाला नसल्याचे वृत्त आहे. यामुळे त्यांनी पूर्ववत मेघराज भोसले यांच्यासोबत राहण्याचा निर्णय झाला. यासंदर्भात सुशांत शेलार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
‘तो’ ठराव नामंजूर, भोसले यांची माफी
संचालक मंडळाची बैठक सुरू होताच मेघराज भोसले यांनी आतापर्यत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करावे अशी भूमिका मांडली.येथून पुढे सगळयांना सामावून घेऊन काम करु अशी ग्वाहीही दिली. आणि २६ नोव्हेंबरचा तो ठराव मागे घ्यावा अशी विनंती केली. यावर अभिनेत्री वर्षा ऊसगावकर, सतीश रणदिवे, रणजित जाधव यांनी भोसले यांच्या कामकाजाचा पाढा वाचला.
त्या अविश्वास ठरावाबाबत निर्णय घेण्यासाठी हात उंचावून मतदान झाले. भोसले यांच्यावरील अविश्वास मंजुरीचा ठराव कायम राहावा म्हणून उपाध्यक्ष धनाजी यमकर, संचालक रणजित जाधव, सतीश रणदिवे, पितांबर काळे, सतीश बिडकर, आणि अभिनेत्री ऊसगावकर यांनी मतदान केले. तर तो ठराव नामंजूर करावा यासाठी अध्यक्ष मेघराज भोसले, खजानिस सुशांत ठुबे, शरद चव्हाण, चैत्राली डोंगरे, विजय खोचीकर आणि अभिनेता सुशांत शेलार यांनी मतदान केले. दोन्ही बाजूंनी सहा, सहा मते पडली. तर संचालिका निकिता मोघे यांनी मतदानासाठी पंधरा मिनिटे वेळ मागवून घेतला. पंधरा मिनिटानंतर त्यांनी मेघराज भोसले यांच्या बाजूनी हात उंचावत पाठिंबा दर्शविला. भोसले यांच्यावरील अविश्वास ठराव नामंजूर झाल्यामुळे अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा त्यांच्या गळयात पडली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला