मेगाभरती भाजपला फायद्याची ठरली नाही : चंद्रकांत पाटील

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपच्या मेगाभरतीमुळे सर्वच राजकीय पक्षांना हादरे बसले होते. परंतू निकालानंतर जे चित्र समोर आले त्यामुळे ही मेगाभरती भाजपला फायद्याची ठरली नाही हे सिद्ध झाल्याची कबुली प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यांच्या या विधानामुळे भाजपमध्येही त्याबाबतीत असंतोष असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून अनेक दिग्गज नेते हे भाजपमध्ये आल्याने भाजपची ताकद वाढली असेही म्हटले गेले. शक्तीसंचय करण्यासाठी असे नेते पक्षात घ्यावे लागतात असा दावा करण्यात आला. गिरीश महाजन या सगळ्या मेगाभरतीचे सूत्रधार होते.

पिंपरी-चिंचवड इथे झालेल्या भाजपच्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होते. ते म्हणाले, मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती थोडी बिघडली. भाजपची संस्कृती अशी नव्हती. हा पक्ष प्रेमावर चालतो. जो काम करतो त्याला नाही तर जो आपल्या जवळ आहे त्याला पदे दिली गेली. ही संस्कृती आता उध्वस्त करावे लागणार असल्याचे ते म्हणाले.

पाटील म्हणाले की माझ्या स्वप्नात परमेश्वर आले आणि मला म्हणाले, योजना म्हणून मी हे सरकार काही महिन्यांसाठी घालवले. या महिन्यांत माणसे जरा चेक करून घ्या. तेवढ्यात मला जाग आली. नाही तर देवाला विचारणार होतो. की किती महिने वाट बघू, ते अस्पष्ट राहिले. हा असा कालावधी मिळाला आहे की ज्यात कोण आपला आहे आणि कोण सत्तेसाठी आला होता. हे तपासायचे असून हेच संघटनेचे बेसिक तत्वज्ञान असल्याचे पाटील म्हणाले.