इस्त्राईल कौन्सलेट-सांस्कृतिक मंत्र्यांची भेट; १६ फेब्रुवारीला मुंबईत ‘मुंबई जेरुसलेम महोत्सव’

मुंबई :- महाराष्ट्र आणि इस्त्राईल देशामध्ये सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होण्याच्या दृष्टीने मुंबईत 16 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय ‘मुंबई जेरुसलेम’ महोत्सव होणार आहे. त्यानिमित्त आज इस्त्राईलचे मुंबईचे कौन्सलेट जनरल याकोव्ह फिन्केस्टिन यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांना या महोत्सवाचे आमंत्रण दिले.

येत्या 15 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय येथे ‘मुंबई जेरुसलेम’ महोत्सवाचे उद्घाटन होणार असून यासाठी जेरुसलेमचे महापौर श्री. मोशे लेऑन उपस्थित राहणार आहेत. तर 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महोत्सवात जेरुसलेम महोत्सवासाठी जेरुसलेमचे वेगवेगळया क्षेत्रातील 30 कलाकार सहभागी होणार आहेत.

जेरुसलेमची संस्कृती, सांस्कृतिक परंपरा, खाद्य संस्कृती यानिमित्ताने मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. तर या महोत्सवामुळे महाराष्ट्र आणि इस्त्राईलमधील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री श्री.देशमुख यांनी यावेळी संगितले.