भाजपच्या बैठीआधी पवारांकडून भूकंप; आजच खडसेंशी भेटून पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरवणार?

Eknath Khadse & Sharad Pawar

मुंबई : कृषी विधेयक आणि इतर प्रश्नांवर राज्य सरकारला घेरण्यासाठी उद्या मुंबईत भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. मात्र भाजपच्या या बैठकीआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) भाजपला (BJP) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली असतानाच त्यांची आजच शरद पवार यांच्यासोबत मुंबईत भेट होण्याची चर्चा रंगली आहे.

शरद पवार आणि खडसेंच्या आजच्या भेटीत पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला जाण्याची शक्याताही सूत्रांनी व्यक्त केली आहे. सरकारनामाने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. एकनाथ खडसे हे पक्षावर नाराज आहेत. त्यांनी उघडपणे आपली नाराजीही व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते होते. त्याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत खडसे हे शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. खडसे काल सहकुटुंब मुक्ताईनगर येथून मुंबईत दाखल झाले आहेत.

आज ते शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र पक्षाच्या उद्या होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आपण मुंबईला आलो असल्याची माहिती खडसेंनी दिली. आज पवारांची भेट घेणार का? या प्रश्नावर मात्र त्यांनी मौन बागळले. त्यामुळे ही भेट आजच होण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, खडसेंनी पक्षावर नाराजी व्यक्त केल्यानंतर शिवसेनेचे नेते व राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी त्यांना शिवसेनेत येण्याचे आवाहन केले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही ते पक्षात आल्यास त्यांचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER