संभाजी भिडे यांची मुख्यमंत्र्यांशी ‘वर्षा’वर अर्धा तास चर्चा

Sambhaji-bhide-cm fadnavis

मुंबई : मातोश्रीवरून रिकाम्या हाताने परतल्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर संभाजी भिडे यांना भेट दिली नाही.

ही बातमी पण वाचा:- उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर ठाम’; एकनाथ शिंदेंची माहिती

शिवसेनेने संभाजी भिडेंना फटकारलं

मुख्यमंत्री आणि भिडे यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. चर्चेचा तपशील गुलदस्त्यात आहे. कारण संभाजी भिडे माध्यमांशी न बोलता निघून गेले. ‘शिवसेनेला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. सर्व कथित आणि तथाकथित मध्यस्थांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप आहे की कुणीही मध्यस्थी करू नये. हा विषय भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमधला आहे.

यात तिसऱ्याने मधे पडण्याची गरज नाही.’ असे म्हणत संजय राऊत यांनी संभाजी भिडे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. ‘राष्ट्रपती राजवटीच्या आडून राजकारण हा राज्यातील जनतेचा अपमान आहे’ अशी टीका भाजपवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत सत्तास्थापनेच्या मुद्यावर भाजपला लक्ष्य केले आहे. तसेच मध्यस्थीच्या मुद्यावरून संजय राऊत यांनी संभाजी भिडे यांनाही फटकारले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे हे मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहचले होते. मात्र उद्धव ठाकरे यांची भेट न झाल्याने भिडे यांना मातोश्रीवरून काढता पाय घ्यावा लागला. संभाजी भिडे यांनी उद्धव ठाकरे यांची वाट पाहिली; पण ते मातोश्रीवर न परतल्यामुळे संभाजी भिडे तिथून निघून गेले.