उद्धव ठाकरे यांना भेटलो, शिवसेनेकडून निमंत्रण मिळाले आहे -भास्कर जाधव

bhaskar jadhav

रत्नागिरी/प्रतिनिधी :- मी उद्धव ठाकरे यांना भेटलो ही गोष्ट खरी आहे. रविवारी माझी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली. सेना सोडल्यानंतर जवळपास १५ वर्षांनी सगळे गैरसमज, सगळी जळमटे निघून गेली. या भेटीत शिवसेनेत येण्याचे निमंत्रणही उद्धवजींनी दिले आहे. मात्र मतदारसंघातील पदाधिकारी व कुटुंबीयांशी चर्चा करून आपण हा निर्णय घेणार असल्याची स्पष्ट कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. सध्या तरी आपण राष्ट्रवादीत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या भेटीची कबुली दिली. ते म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून  उद्धवजींशी माझा दूरध्वनीवरून संवाद सुरू होता, पण भेट झाली नव्हती. २००४ ला शिवसेना सोडण्याचे कारण, त्यावेळची परिस्थिती यावर आमच्या भेटीत चर्चा झाली. त्यावेळी अनेक गैरसमज दूर झाले.  उद्धव ठाकरेंनाही अनेक गोष्टी कळून चुकल्या. या चर्चेमुळे मनात असलेले दडपण, जळमटे निघून गेली, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

या चर्चेदरम्यान ठाकरेंनी आपल्याला शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले आहे. सध्या तरी आपण त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. असा निर्णय घेताना आपण कुटुंब आणि मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना नक्की विश्वासात घेऊ असे ते म्हणाले. मात्र गेले चार ते पाच दिवसांपासून गुहागर मतदारसंघासह राज्यातील हितचिंतक दूरध्वनीवरून संपर्क साधू लागले आहेत. तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल. तुम्ही तिथे आम्ही अशा लोकांच्या प्रतिक्रिया येत असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरून आपले बोलणे झाले. जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. शिवसेना प्रवेशाबाबत अजून निर्णय झालेला नाही. कार्यकर्त्यांच्या सल्लामसलतीनंतर काय ते ठरवेन, असे त्यांनी सांगितले.