औषधी निर्माण – आयुर्वेदाची संपन्नता !

Ayurvediac Medicine

आयुर्वेदीक (Ayurved) औषधे आपण विविध स्वरूपात घेत असतो. कधी कधी थट्टेने म्हणतो खूपच कडू काढा प्यायला लावतात. परंतु विविध स्वरूपात औषध निर्माण करणारे आयुर्वेद हे एकमेव शास्त्र आहे. काही औषधी त्या त्या स्वरूपात घेतल्या तरच फायदेशीर ठरतात. आयुर्वेदात औषधनिर्माण (Ayurved Medicine) याला खूपच महत्त्व आहे व विविध प्रक्रिया करून ते तयार केले जाते.

Ayurveda Medicine Turmeric | Dharma

 • उदा. स्वरस – ओल्या वनस्पतींना कुटून स्वच्छ कपड्यात बांधून रस काढणे. उदा. तुळशीचा रस किंवा आल्याचा रस. हे त्वरीत काढलेले प्रभावी असते. अल्प प्रमाण सुद्धा जास्त गुणकारी ठरते.
 • कल्क – खरल किंवा पाट्यावर ओल्या औषधी वाटणे किंवा वाळलेली चूर्ण पाणी दूध इ. सह वाटून देणे. उदा. कडूलिंब पानांचा कल्क, आलं सैंधव लिंबूरस.
 • क्वाथ – काढा करणे. पाणी वा दूधात औषधी उकळणे. अर्ध- चतुर्थांश- अष्टमांश शिल्लक ठेवून हा काढा तयार केला जातो. उदा. दशमूल काढा, सुंठ काढा इ. फांट, शीत हे सुद्धा २ वेगळे प्रकार आहेत यात चूर्ण पाण्यात न उकळता गरम पाण्यात भिजवून ठेवतात. थंड झाल्यावर पिण्यास देतात. उदा. सौफ फांट. पाण्यात उकळल्यास त्याचा अर्क उडून जातो म्हणून काही वनस्पतींचा काढा हा फांट स्वरूपातच गुणकारी ठरतात.
 • वटी – औषधींच्या चूर्णांना काढा किंवा इतर द्रव द्रव्यात भिजवून, भावना देऊन, वाळवून त्याच्या टॅबलेट तयार करण्यास सांगितल्या आहेत. त्यामुळे कमी प्रमाणात सुद्धा हे औषध प्रभावी ठरते. उदा. चंद्रप्रभा वटी, त्रिफळा गुग्गुळ इ.
 • अवलेह – काही कल्प शिजवून तयार केले जातात. त्यात अनेक औषधींचा स्वरस, चूर्ण तसेच तेल तूप मध साखरेचा वापर करून चाटण स्वरूपात केले जाते. किंवा काही चूर्ण मधासह चाटण स्वरूपात सांगितले जाते हे सुद्धा अवलेहच.

  उदा. च्यवनप्राश, बिल्वावलेह

 • सिद्ध तेल / घृत – ही आयुर्वेदाची विशेषता आहे. स्वरस, काढा, कल्क, दूध जल इ. तसेच तेल किंवा तूप टाकून, उकळवून फक्त तेल वा तूप उरेल तोपर्यंत शिजवितात. ज्यायोगे औषधींचे गुण तेलात उतरेल. सिद्धतेल किंवा तूप निर्माणाकरीता विशिष्ट परिक्षासुद्धा आयुर्वेदात सांगितल्या आहेत. त्या कसोटीवरच तेल / तूप निर्माण करणे आवश्यक असते तरच औषधीतेलाचा / तूपाचा उपयोग होतो. सिद्धतेल / तूप मालीश, केसांना लावण्याकरीता, शिरोधारा, नस्य, पंचकर्म चिकित्सा, आभ्यंतर चिकित्सेमधे वापरतात.

उदा. नारायण तेल, भृंगराज तेल, फल घृत, महाकल्याणक घृत इ.

 • चूर्ण – विविध औषधींचे योग्य मात्रेत संयोग करणे. उदा. सितोपलादि चूर्ण, स्वादिष्टविरेचन चूर्ण, हिंग्वाष्टक चूर्ण इ.

  भस्म / रसौषधी – खनिज द्रव्य आयुर्वेदात वर्णित अनेक व्याधींमधे दिली जातात. सर्व धातु उपधातु उदा. स्वर्ण रौप्य अभ्रक लोह अशी अनेक खनिज द्रव्य वापरली जातात. परंतु भस्म रुपात. या द्रव्यांचा शरीरावर औषधी परीणाम व्हावा म्हणून यावर खूप प्रक्रिया केल्या जातात त्यानंतर ते भस्म स्वरूपात प्राप्त होतात. या भस्माचा उपयोग अनेक व्याधींमधे अल्प मात्रेत लवकर उपशय मिळण्याकरीता होतो. भस्म ही संकल्पना आयुर्वेदाची खूप मोठी देणगी आहे. खनिज द्रव्याचे शोधन मारण भस्मीकरण करण्याकरीता कोणत्या खनिज द्रव्याकरीता नेमके काय वापरावे, कोणती प्रक्रिया करावी किती वेळ घोटावे, किती वेळ अग्नीवर तापवावे, किती प्रमाणात औषधात वापरावे इतके सूक्ष्म विवेचन करणारे शास्त्र आपले आयुर्वेद आहे.

 • आसव अरिष्ट – अनेक दिवस संधान ( फरमेन्ट) प्रक्रीयेद्वारा औषध काढा पाणी गुळ धातकी इ. द्रव्याचा वापर करून आसव अरिष्ट तयार केले जातात. उदा. द्राक्षासव, अभयारिष्ट, अशोकारिष्ट

 

 • लेप मलम – बाह्य प्रयोगार्थ लेप सांगितले आहेत. वेदनाशामक, वर्ण्य, त्वचाविकार दूर करणारे, हाड

  जुळवून आणणारे, गाठ कमी करणारे असे अनेक लेप आयुर्वेदात वर्णित आहेत. काही अवस्थेमधे गरम करून तर काही थंड स्वरूपात लावतात. उदा.दशांग लेप, राळेचा मलम इ.

 • अर्क निर्माण – विविध वनस्पतींचे अर्क कसे काढावे त्याचा उपयोग हे देखील आयुर्वेद औषधी निर्माणाचा भाग आहे.

  या व्यतिरीक्त वर्ति (suppository), अंजन , धूपन धूमपान हे सुद्धा औषधी निर्माणात वर्णित आहेत.

औषधी आहारासह निर्माण हे सुद्धा आयुर्वेदाचे वैशिष्ट्य आहे. औषधांचा वापर करून यवागु ( पातळ भात), क्षीरपाक ( सिद्ध दूध), विलेपी, यूष ( सूप)

विविध प्रकारे बाह्य वा आभ्यंतर उपयोगाकरीता औषधी निर्माण सांगणारा, वनस्पतीज खनिज प्राणिज द्रव्य इतक्या विविध प्रकारे वापरणारे हे आयुर्वेदशास्त्र किती संपन्न आहे हे लक्षात येते.

 

 

 

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER