आजार, अशक्तपणा दूर करणाऱ्या औषधी पाककृती ! भाग -२

हिम फाण्ट सारख्या काही औषधी कल्प आपण बघितले. बरेच वेगवेगळ्या पद्धतीने आयुर्वेदीक आहार कल्पना सांगितल्या आहेत त्यापैकी एक आहे मण्ड. मण्ड म्हणजे कढण म्हणू शकतो. मूग किंवा तांदळाच्या १४ पट पाणी घेऊन ते उकळावे शिजल्यावर ते पाणी गाळून घ्यावे. यात सैंधव सुंठ पावडर टाकून पिण्यास दिले जाते. यात मूगाचे वा इतर धान्याचे कण नसतात. असे हे कढण वा मण्ड दोषांचे पाचन करणारे, भूक वाढविणारे अजीर्ण दूर करणारे तसेच ज्वरामधे तोंडाला कडू चव, जडपणा, अरुचि दूर करणारे आहे.

अष्टगुण मण्ड – मूग व तांदूळ समप्रमाणात घेऊन भिजत ठेवावे. त्याच्या १४ पट पाणी घालून उकळवावे. भातकण शिजल्यावर त्यात धणे पूड, सुंठ मिरे पिंपळी व सैंधव घालून त्यावर तेल हिंग जीरे फोडणी द्यावी. याचे आठ उपयोग आहेत म्हणून याला अष्टगुण मण्ड म्हणतात.

१. अग्निवर्धन होणे २. शक्ति ताकद वाढणे ३. मूत्र प्रवर्तन चांगले होणे. ४. रक्तवर्धन ५. ज्वर कमी होणे. तसेच वाढलेल्या ६. वात ७. पित्त ८. कफ दोषांना कमी करणारे हे मण्ड आहे.

तयार करायला पण सोपे व तेवढेच उपयोगी.

सूरणावलेह – सूरण हे कंद मूळव्याध रोगावर अतिशय गुणकारी आहे. याची भाजी, पोट फुगणे सतत ढेकर येणे भूक न लागणे तसेच अर्शामधे देतात. याचा अवलेह पण बनविता येतो. सूरणाचे बारीक काप करून स्वच्छ धूवून दुप्पट पाण्यात उकळावे. अर्धेपाणी शिल्लक राहिले सूरण नरम झाले की गाळून घ्यावे. हे गाळलेले पाणी फेकू नये. सूरण काप कुस्करून तूपावर परतावे. खमंग परतवले की गाळलेले पाणी टाकावे व जेवढे वाटी सुरणाचे काप होते तेवढीच साखर टाकावी. घट्टसर मुरब्बा तयार झाला की गॅस बंद करून त्यात सुंठ, दालचिनी, वेलचीपूड मिरेपूड घालावी. हे सूरणावलेह मूळव्याध मंदाग्नि दूर करणारे आहे.

अशा अनेक व्याधीहर पाककृती आहारकल्पना आयुर्वेद ग्रंथामधे आढळतात. रुग्णाचा औषधीपासून आहारापर्यंत विचार करणारे आपले चिकित्साशास्त्र किती परीपूर्ण आहे हे नक्कीच लक्षात येते.

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER