मेडिकल विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

Medical student's suicide attempt

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्नालयाच्या (मेडिकल) ‘एमबीबीएस’ द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने नैराश्येतून गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. हि घटना गुरुवारी उघडकीस आली. मेडिकलच्या अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार, अकोला येथील रहिवासी असलेल्या या विद्यार्थिनीला ‘डिप्रेशन’ म्हणजे नैराश्याचा आजार आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून ती या आजारावर औषधे घेत होती. वसतिगृह क्रमांक २ मधील आपल्या खोलीत ती एकटी होती. अचानक तिने २०-२५ तापाच्या गोळ्या खाल्या. त्याच वेळी खोलीतील मैत्रीण आली. तिची अवस्था पाहत तिने आरडाओरड करून इतरांना बोलवून घेतले. लागलीच मेडिकलच्या अपघात विभागात दाखल केले. तातडीने उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचल्याचे बोलले जात आहे.

गत तीन वर्षांच्या कालखंडात दोन आत्महत्या व तीन आत्महत्येचा प्रयत्न, अशा पाच घटना उघडकीस आल्या. पाच महिन्यापूर्वी निवासी महिला डॉक्टरने सर्जिकल ब्लेडने गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आजच्या पाचव्या घटनेत तापाच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने मात्र मेडिकल परिसरात भीतीचे वातावरण आहे. अधिष्ठाता यांनी या घटनेची दखल घेत अधिक चौकशीचे आदेश दिले आहेत.