मयूरी येणार ‘इमली’सोबत

mayuri deshmukh

कोरोना (Corona) लॉकडाऊन (Lockdown) काळात अनेकांचे आयुष्य बदलून गेले. अनेकांच्या जवळची माणसं त्यांच्यापासून कायमची हिराहून गेली. अचानक बसलेल्या धक्क्यातून सावरून पुढं जाणं खरंच खूप मुश्कील होतं. अभिनेत्री मयूरी देशमुख (Mayuri Deshmukh) हिच्याही आयुष्यात अशाच प्रसंगाला तिला समोरे जावे लागले. पती आशुतोष भाकरे याने आत्महत्या केल्यामुळे तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण शो मस्ट गो ऑन या उक्तीप्रमाणे मयूरी आता तिच्या पतीच्या दुःखातून बाहेर पडत पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर उभी राहण्यासाठी तयार झाली आहे. ‘इमली’ या हिंदी मालिकेत मयूरी दिसणार आहे.

ती लवकरात लवकर कॅमेर्‍यासमोर यावी यासाठी तिचे कुटुंबीय तिला धीर देत होते. मात्र तिला स्वतःला थोडा वेळ घ्यायचा होता आणि आशुतोषच्या आठवणी जपत अभिनयाची कारकीर्द सुरू ठेवायची होती. आता ती वेळ आली आहे असे ती सांगते. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घरोघरी पोहचलेली मयूरी देशमुख हिच्यावर कोरोना काळात ओढवलेला प्रसंग हा तिच्या चाहत्यांनाही दुःख देणारा होता. मयूरीचा पती आशुतोष भाकरे याने कोरोना काळात नैराश्यातून आत्महत्या केली. कोरोनामुळे मार्चपासून संपूर्ण मराठी सिनेमा इंडस्ट्री ठप्प झाली. त्यामुळे अनेक कलाकार घरात बसून होते. आशुतोष भाकरे यालाही काही काम नव्हतं आणि याच गोष्टीचं नैराश्य त्याला आलं.

आशुतोष आणि मयूरी मुंबई सोडून या काळामध्ये नांदेडच्या घरी गेले असताना त्या ठिकाणी आशुतोषने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्यावर मानसिक उपचारही सुरू होते; मात्र पूर्णपणे बरे होण्यापूर्वीच आशुतोषने जीवनयात्रा संपवली. मयूरी आणि आशुतोषच्या लग्नाला अवघी तीनच वर्षे झाली होती. आशुतोष फक्त बत्तीस वर्षांचा होता. या सगळ्याच गोष्टीचा मयूरीच्या मनावरदेखील खूप मोठा परिणाम झाला होता. त्यानंतर मराठी सिनेमा इंडस्ट्री मध्ये शूटिंग सुरू झालं. पुन्हा ही इंडस्ट्री पूर्वपदावर यायला लागली. त्यामुळे मयूरीने पुन्हा एकदा अभिनय कारकीर्दीला सुरुवात करावी आणि आशुतोषच्या दुःखातून तिने सावरावे, अशी इच्छा तिचे सासू-सासरे तसेच आईवडीलदेखील व्यक्त करत होते. या संदर्भात या सगळ्यांनी मयूरीशी संवाददेखील साधला होता. मयूरी सांगते की, माझे आणि आशुतोषचे वैवाहिक नाते खूप छान होते.

खरे तर आशुतोषने घेतलेला हा टोकाचा निर्णय मलादेखील खूप दु:खदायक होता. त्यामुळे मला त्याच्या नसण्याच्या दुःखातून बाहेर यायला थोडा वेळ हवा होता. म्हणूनच मी असं ठरवलं होतं की, जेव्हा मला मनापासून वाटेल की, आता नव्या मालिकेत, सिनेमात काम करावं तेव्हाच मी कॅमेऱ्यासमोर उभी राहीन. दरम्यान मला गेल्या महिन्यापासून काही ऑफर येत होत्या; पण माझी मनापासून इच्छा होत नव्हती. आता मी असा विचार करते की, मी पुन्हा नव्या उभारीनं काम करणं हीच आशुतोषला श्रद्धांजली असेल. त्याला नेहमी असं वाटायचं की, कलाकाराला नेहमी काम हातात असलं पाहिजे आणि हातात आलेल्या कामाचा त्यानं आदर आणि स्वीकार केला पाहिजे. म्हणूनच दुःख उगाळत बसून आपल्या हातात आलेल्या चांगल्या कामांच्या ऑफर्स नाकारणं हे आशुतोषला पटलं नसतं आणि म्हणूनच मी असा निर्णय घेतला की, आता पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर उभं राहायचं.

मयूरी ज्या ‘इमली’ मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे ती मालिका प्रेमाच्या त्रिकोणावर आधारित आहे. गावाकडील मुलगी लग्न होऊन शहरात येते आणि त्यानंतर तिच्या नवर्‍याच्या आयुष्यात त्याची जुनी मैत्रीण येते. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय घडामोडी होतात यावर ही मालिका बेतलेली आहे. अभिनेता गश्मीर महाजनी या मालिकेमध्ये तिचा सहकलाकार असून गश्मीर आणि मयूरी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. ‘इमली’ म्हणजे चटपटीतपणा. चिंच जशी खट्टी-मिठी असते तसे आपले आयुष्यदेखील अनेक गोष्टींनी खट्टा-मिठ्ठा झालेलं असतं.

मयूरी सांगते, माझ्या आयुष्यात गेल्या काही वर्षांत असे चढ-उतार आले. आंबट-गोड क्षण आले; पण आपण आता किती दिवस दुःखामध्ये राहून आपल्या कुटुंबीयांनादेखील दुःख द्यायचे याचा विचार करून मी नव्याने माझ्या आयुष्याला सुरुवात केली आहे. यामध्ये नक्कीच माझा पती आशुतोषच्या आठवणी सोबत असणार आहेत. मयूरीने यापूर्वी ‘ते ३१ दिवस’ या सिनेमातही काम केले आहे. तसेच ‘तिसरे बादशाह हम’, ‘प्लेझंट सरप्राईझ’ या नाटकांत मयूरीचा अभिनय आपण पाहिला आहे. आता ती नव्याने हिंदी मालिकेमध्ये अभिनयाची छाप दाखवण्यासाठी तयार झाली आहे. या निमित्ताने ती तिच्या आयुष्यात घडलेल्या दुःखद प्रसंगापासून थोडीशी लांब जाऊन तिच्या आवडत्या अभिनयाशी एकरूप व्हावी असे तिच्या चाहत्यांना मनापासून वाटत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER