मयूरी पुन्हा बोलली

Mayuri Deshmukh

अभिनेत्री मयूरी देशमुख हिचा पती आशुतोष भाकरे याने चार महिन्यांपूर्वी आत्महत्या केल्यानंतर मयूरीला प्रचंड धक्का बसला होता. त्यानंतर नुकतीच या दुःखातून सावरत मयूरीने ‘इमली’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. तिच्या या सकारात्मक विचारासाठी तिला तिच्या चाहत्यांनीदेखील पाठिंबा दिला होता. तिच्या या सगळ्या दुखऱ्या प्रवासाच्या दरम्यान आनंदवन येथील महारोगी समितीच्या प्रमुख डॉक्टर शीतल आमटे यांनी- मी तुझ्या पाठीशी आहे. तू खंबीरपणे या सगळ्या संकटात स्वतः उभी राहा, असं सांगत धीर दिला होता. मात्र गेल्याच आठवड्यात शीतल आमटे यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्यानंतर मयूरी पुन्हा एकदा अस्वस्थ झाली.

याच निमित्ताने मयूरीने तिच्या सोशल मीडिया पेजवरून, मनातलं बोला… संकटात असताना, मानसिक खचलेल्या अवस्थेत असताना एखाद्याकडे मदत मागा. त्यामुळे आपल्या स्वाभिमानाला धक्का पोहचत नाही किंवा त्याच्यामध्ये कुठलाही कमीपणा न बाळगता प्रसंगी एखाद्याच्या समोर मनसोक्त रडा, असा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या आपण मनाने खंबीर असणे ही खूप मोठी गरज आहे, असे सांगत तिने या सगळ्या प्रकरणावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेली तसेच ‘प्लेजेंट सरप्राईज’ यासह ‘तिसरे बादशाह हम’ या नाटकामुळे लोकप्रिय झालेल्या मयूरी देशमुखच्या आयुष्यात काही महिन्यांपूर्वी एक वेगळेच वादळ आले.

तिचा पती आणि अभिनेता असलेला आशुतोष भाकरे याने लॉकडाऊन काळात हातातलं काम गेल्यानं तसेच कुठलेही काम नसल्याच्या मानसिक खच्चीकरण यातून आत्महत्या केली होती. अवघ्या तीन वर्षांच्या सहजीवन प्रवासात आशुतोष सोडून गेल्याने मयूरी प्रचंड खचली होती. त्यानंतर ती दोन महिने कुठल्याही कॅमेऱ्यासमोर आली नाही. आशुतोषच्या आठवणीत स्वतःला वाहून घेतले होते . दरम्यान कोणतीही ओळख नसताना किंवा पूर्वपरिचय नसताना शीतल आमटे यांनी मयूरीला फोन करून तिच्यावर आलेल्या मानसिक संकटात तिला धीर दिला होता.

शीतल आमटे यांच्याविषयी मयूरी खूप ऐकून होती. प्रचंड ताणतणाव असलेले त्यांचे क्षेत्र आणि त्यांनी आपलं दुःख समजून घेत आपल्याला दिलेला आधार तिला खूप महत्त्वाचा वाटला होता. तसेच मयूरीचे चाहते, प्रेक्षक यांनीदेखील तिच्या इन्स्टा पेजवर कमेंट करून तिने पुन्हा कामाला सुरुवात करावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मयूरीनेदेखील पुन्हा एकदा या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर अभिनयाला सुरुवात करावी हा विचार पक्का केला आणि ती गेल्याच महिन्यात ‘इमली’ या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. पती गेल्याचं दुःख जरी कमी नसलं तरी त्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी तिला तिचं कामच आनंद देणार आहे याची तिला जाणीव होती.

नुकताच तिच्या सोशल मीडिया पेजवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये मयूरी असे म्हणते की, मला अनेकांनी असं सांगितलं की , मयूरी तू खूप स्ट्रॉंग आहेस. पण मी खरंच इतकी स्ट्रॉंग नाही. मी रोज रडते. आशुच्या आठवणीने मला खूप दुःख होतं. स्वतःच्या अनुभवावरून मी सांगते की, जेव्हा तुम्हाला कुठलाही मानसिक आधार हवा असतो तेव्हा तुम्ही निर्लज्ज होऊन तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक अशी कोणती तरी व्यक्ती शोधून तिच्याकडे तुमचं सगळं मन मोकळं केलं पाहिजे. शेअर करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. अनेकदा आपण आपल्या दुःखाची लाज बाळगत असतो किंवा आपल्याला त्यांच्याविषयी असे वाटते की, मी माझे प्रॉब्लेम्स कशाला कोणाला सांगू? पण माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगायचं तर मी अनेकदा सतत त्याच त्याच गोष्टी माझ्या मित्रमंडळींशी बोलत असते.

मला माहीत आहे कधी कधी त्यांनादेखील ऐकून कंटाळा येत असेल. पण मला हेदेखील जाणवलं की, जोपर्यंत माझ्या मनात साचलेल्या दुःखद भावना बाहेर येणार नाहीत तोपर्यंत मी मानसिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने सक्षम होऊ शकत नाही. डॉ. शीतल आमटे, ज्या मला आधार देण्यासाठी पुढे आल्या त्यांना शेवटच्या क्षणी असा आधार मिळाला नसेल का ? हा प्रश्न मला सतावत आहे. सोशल मीडियाबाबत अनेकदा खूप काही बोललं जातं; पण मला माझ्या मानसिक अस्वस्थ असल्याच्या काळात सोशल मीडियाची ताकद कळून आली. खरा संवाद साधण्यासाठी सोशल मीडियासारखे माध्यम नाही. मला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा मी माझ्या सोशल मीडियावरून हाक दिली.

प्रत्येक वेळी मला लगेच प्रतिसाद दिला. सध्याच्या काळामध्ये आपण भौतिकदृष्ट्या खूप सक्षम असू पण मानसिकदृष्ट्या जर आपल्याला सक्षम व्हायचे असेल तर मोकळेपणाने आपल्या मनात जे जे साठलेले आहे ते ते बोलण्यासाठी आपल्याला अशी माणसं आता कमवावी लागतील, जी आत्महत्येचा मार्ग निवडण्यापूर्वी तुम्हाला त्या मार्गापासून परावृत्त करण्यासाठी मदत करतील. गेल्या आठवड्यात शीतल आमटे यांच्या आत्महत्येनंतर अनेक क्षेत्रातील लोक व्यक्त झाले. त्यामध्ये मयूरीदेखील होती.

तिच्या आयुष्यात घडलेला दुःखद प्रसंग, त्यानंतर तिचं अस्वस्थ होणं, त्या वळणावर शीतल आमटे यांच्याकडून तिला धीर देणारे शब्द आणि आमटे यांनी आत्महत्या करणं या सगळ्याचे वैचारिक अर्थ लावत असताना मयूरीने हेच सांगितले आहे की, जे मनात आहे ते बोलण्यासाठी ऐकणारे कान नेहमी तुमच्याजवळ असू द्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER