इमलीच्या सेटवर मयुरीला मिळालं खास सरप्राईज

Mayuri & Anoop Deshmukh

मालिकांच्या शूटिंगचे शेड्यूल जवळपास 14 ते 18 तास असतं आणि जेव्हा इतका सलग वेळ काम करण्यासाठी नेहमीच कलाकारांना त्यांच्या घरापासून, कुटुंबीयांपासून लांब राहावं लागतं. अशा वेळेला अचानक जेव्हा त्यांच्या कुटुंबातील कुणीतरी सदस्य थेट त्यांना सेटवर येऊन भेटतो तेव्हा त्या कलाकारांना होणारा आनंद काही वेगळाच असतो. त्यांचा सगळा कामाचा ताण, कंटाळा एका क्षणात निघून जातो. मालिकांचे से ट असतील किंवा रियालिटी शोचे सेट असतील तिथे अचानक त्या कलाकारांच्या कुटुंबातील सदस्यांना बोलवून कलाकारांना सरप्राईज देण्यासाठी चॅनलची टीम देखील नेहमीच उत्सुक असते. असाच काहीसा मजेशीर किस्सा घडला अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्या बाबतीत. सध्या ती इमली या हिंदी मालिकेत काम करत आहे या मालिकेच्या सेटवर तिचा भाऊ अनुप जाऊन अचानक धडकला आणि त्यानंतर सेटवर तिच्यासोबत त्याने धमाल मस्तीही केली. मयुरीने हा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया पेज वर शेअर करत अनूप सोबतची ही सरप्राईज भेट पुढच्या काही दिवसांसाठी माझ्यासाठी एनर्जी असेल असं कमेंट मध्ये म्हटलं आहे.

खुलता कळी खुलेना या मालिकेतून लोकप्रिय झालेली मयुरी देशमुख सध्या इमली या हिंदी मालिकेत निधी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. मराठी मालिकाबरोबरच मयुरीने हिंदी मालिकेत देखील तिचा फॅन क्लब निर्माण केला आहे. प्लेझंट सरप्राईज या नाटकातील तिचा अभिनयही तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला होता. याशिवाय जाहिराती मध्येही मयुरी नेहमी हटके काम करतांना आपल्याला दिसत असते. सहा महिन्यापूर्वी मयुरीच्या आयुष्यात एक घटना घडली आणि त्यानंतर ती छोट्या पडद्यापासून लांब होती. अभिनय क्षेत्रात असलेला मयुरीचा नवरा आशुतोष भाकरे याने लॉकडाऊन काळात आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्यामुळे मयुरीचं आयुष्य देखील काहीसं विचित्र वळणावर येऊन थांबलं होतं. या दरम्यान तिने नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून संवादही साधला होता.

त्यानंतर जेव्हा बाबा आमटे यांच्या यांची नात शितल करजगी यांनी आत्महत्या केली त्यावर देखील मयुरी व्यक्त झाली होती. आशुतोषच्या जाण्यानंतर ती काही दिवस घरी थांबली पण तिच्या कुटुंबियांनी तिने पुन्हा काम सुरु करावे यासाठी खूप प्रोत्साहन दिलं होतं. यामध्ये तिचा भाऊ अनुप याचं देखील खूप मोलाचे योगदान आहे. दोन महिन्यांपूर्वीच मयुरीने इमली ही मालिका स्वीकारली आणि या मालिकेच्या शूटिंगसाठी ती नव्या उमेदीने आशुतोषच्या आठवणी मनाच्या एका कप्प्यात ठेवून बाहेर पडली.

इमलीच्या शूटिंगमध्ये व्‍यस्‍त राहिल्यामुळे तिला अनेक दिवस घरी जायला वेळ मिळाला नव्हता पण मयुरीला जाऊन भेटावं असं तिच्या भावाला वाटत होतं. आणि तो थेट इमली मालिकेच्या सेटवर जाऊन पोहोचला. अर्थातच ही भेट मयुरीसाठी खूप सरप्राईज असल्याने तिला खूप आनंद झाला.

मयुरी सांगते, हो, गेल्या सहा महिन्यात मी आयुष्याचं वेगळं रूप अनुभवलं. आशुतोष जरी आज माझ्या आयुष्यात नसला तरी त्याच्या आठवणीच्या रूपाने नेहमी माझ्या सोबत राहणार आहे. त्याच्या आठवणींमध्ये मी केवळ घरात बसून न राहता माझ्या आवडीच्या क्षेत्रात पुन्हा एकदा सक्रीय व्हावे यासाठी अनुपने मला खूप पाठिंबा दिला. प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये तिचा भाऊ एक वेगळे स्थान असतो. आमच्या दोघांची केमिस्ट्री अशीच आहे. अनुप नेहमीच माझ्या चांगल्या वाईट प्रसंगात माझ्या सोबत असतो. जेव्हा तो इमलीच्या सेटवर येऊन अचानक मला भेटला तेव्हा सुरुवातीला मला खूप रडू आलं कारण गेल्या कित्येक दिवसात मी माझ्या फॅमिलीला भेटलेले नव्हते आणि त्यामुळे अनुपला भेटल्यामुळे मला सगळ्या फॅमिलीला भेटल्याचा अनुभव आला.

तेव्हा मी मालिकेमध्ये किचनचा सेट लागलेला आहे त्या ठिकाणी होते. अनुप मालिकेतल्या किचनमध्ये आला आणि त्या ठिकाणी मांडलेल्या भांड्यांमध्ये काय आहे हे तपासून पाहू लागला. त्यावरून आम्ही खूप एकमेकांची चेष्टा मस्करी केली. अनुपच्या येण्याने आमच्या सेटवरचं वातावरण देखील खूप बदलून गेलं. सगळ्यांशी त्याची ओळख करून देताना मला खूप अभिमान वाटत होता. जेव्हा आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडत असतात ज्यामुळे आपण दुःखी होत असतो तेव्हा कुटुंब हेच आपलं बलस्थान असतं याची जाणीव मला माझ्या आयुष्यातल्या काही प्रसंगांनी दिली. अनुपच्या येण्याने त्याच्या भेटण्याने एक वेगळी एनर्जी मला मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER