मयूरी झाली भावुक !

mayuri deshmukh.jpg

आपल्या आयुष्याचा जोडीदार अर्ध्यावरच आपली साथ सोडतो ते दुःख प्रत्येकासाठीच मोठं असतं . मग ती सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा कोणी सेलिब्रिटी. आपल्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीसोबत आपल्या अनेक आठवणी जोडलेल्या असतात आणि मग जेव्हा अशी परिस्थिती येते की, तिच्यापासून कायमचं लांब होण्याची वेळ नियती आपल्या आयुष्यात आणते तेव्हा या आठवणीच त्या व्यक्तीशी जोडून ठेवत असतात. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री मयूरी देशमुखचा (Mayuri Deshmukh) नवरा अभिनेता आशुतोष भाकरे याने आत्महत्या केल्यानंतर मयूरीलाही मोठा धक्का बसला होता. त्यामुळे ती सोशल मीडियावरदेखील ऍक्टिव्ह नव्हती. मात्र मयूरी आणि आशुतोषच्या श्वेता या कॉमन मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मयूरीला आशुतोषची खूप आठवण आली आणि अशा सगळ्या आठवणी तिने आपल्या मैत्रिणीबरोबर शेअर केल्या आहेत.

आशुतोष जेव्हा डिप्रेशनमध्ये होता तेव्हा श्वेता या मैत्रिणीने त्या दोघांना खूप सपोर्ट केला होता आणि आज श्वेताच्या वाढदिवसानिमित्त तिचे आभार मानत असताना आशुतोषविषयी मनात साठलेल्या अनेक आठवणींना मयूरीने वाट मोकळी करून दिली आहे. ‘खुलता कळी खुलेना’ या मराठी मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री मयूरी देशमुख हिचा पती आशुतोष भाकरेने गेल्या २९ जुलै रोजी नांदेडमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आशुतोष दीर्घकाळापासून डिप्रेशनमध्ये होता आणि डिप्रेशनमुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले होते. आशुतोषच्या अकाली निधनाने मयूरीला जबर धक्का बसला होता. मयूरी अद्यापही या धक्क्यातून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करतेय. ११ ऑगस्टला आशुतोषचा वाढदिवस होता. या वाढदिवशी मयूरीने पतीच्या स्मरणार्थ एक भावुक पोस्ट लिहिली होती. तेव्हापासून ती सोशल मीडियापासून लांब होती; पण आता पुन्हा एकदा मयूरीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. खरे तर हा व्हिडीओ तिने तिच्या खास मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोस्ट केलाय. पण यात ती पूर्ण वेळ आशुतोषबद्दलच बोलतेय.

हॅपी बर्थ डे श्वेता, माझ्याकडून आणि आशुकडून तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आशु फार व्यक्त होत नव्हता. त्यामुळे तू त्याच्या आयुष्यात किती महत्त्वपूर्ण होतीस, हे त्याने कधीच तुला सांगितले नसेल. विशेषत: गेल्या वर्षभरात तू आमच्यासाठी जे काही केलेस, त्याबद्दल मी तुझी आभारी आहे. तू माझी बेस्ट फ्रेन्ड असूनही तू आशुला त्याच्या पद्धतीने समजून घेतलेस. कधीही जज न करता त्याच्यासाठी खूप काही केलेस. हा आमचा प्रवास होता, तसा तुझाही होता. डिप्रेशनला कसे समजून घ्यायचे, त्याला कसे सामोरे जायचे, हे सगळे आम्ही शिकत असताना तूसुद्धा या प्रवासात आमच्यासोबत होती. मला माहीत नाहीस, तुझ्याशिवाय आम्ही अनेक टप्पे कसे पार केले असते. तू फक्त मागून मार्गदर्शन केले नाहीस तर आशुसोबत तूसुद्धा सगळे भोगले. तू मैत्री निभवलीस. तू अनेकदा आमच्यासाठी नागपूरहून मुंबईला आलीस. तुझ्यामुळे आमचा प्रवास सुसह्य झाला. आपले प्रयत्न फसले, त्याचे दु:ख आमच्याइतकेच तुलाही आहे. आशु आज आपल्यासोबत नाही. पण कृपा करून तू हताश होऊ नकोस. कारण तुझ्यासारख्या व्यक्तीची जगात खूप गरज आहे. मला विश्वास आहे, आशु एक तारा बनून अवकाशात चमकत असेल. तुझ्यासारखी मैत्रीण मला मिळाल्याबद्दल आशुला खूप अभिमान होता आणि असेल. आनंदी राहा. खूप खूप प्रेम…

आशुतोष व मयूरी यांनी २० जानेवारी २०१६ रोजी लग्नगाठ बांधली होती. आशुतोष भाकरेने २९ जुलैला सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान राहत्या घरीच गळफास घेऊन आयुष्य संपवले होते. लॉकडाऊनमध्ये दोघेही एकत्र होते. आशुतोष भाकरेने ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ या चित्रपटांत भूमिका साकारली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER