‘देव तारी त्याला कोण मारी?’ सेकंदांच्या फरकाने वाचवले चिमुकल्याचे प्राण; रेल्वेमंत्र्यांकडून कौतुक

रायगड : ‘देव तारी त्याला कोण मारी?’ याचा साक्षात प्रत्यय वांगणी रेल्वेस्थानकात पाहायला मिळाला आहे. पॉइंटमन म्हणून वांगणी रेल्वेस्थानकात कार्यरत असलेल्या मयूर शेळके (Mayur Shelke) यांनी सेकंदाचाही विलंब न केल्याने एका चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. विशेष म्हणजे अवघ्या काही सेकंदांनी मुलाचा जीव वाचला. त्या चिमुकल्याची आई अंध असल्याने मला त्याचा जीव वाचवायचा होता, असं शेळके यांनी म्हटलं आहे.

मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. शेळके यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसाचं अधिकाऱ्यांपासून रेल्वेमंत्र्यांपर्यंत सर्वांनी कौतुक केलं आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्वतः फोन करून शेळके यांचे कौतुक केले तसेच ट्विट करत अभिनंदन केले. वांगणी स्थानकावर एक अंध महिला आपल्या लहान मुलाला घेऊन फलाटावरून जात होती. हा लहान मुलगा आईच्या हातातून सुटून थेट रेल्वे ट्रॅकवर पडला आणि मुंबईच्या दिशेने उद्यान एक्सप्रेस भरधाव वेगाने येत होती. ही आई जीवाच्या आकांताने मुलाला वाचवण्यासाठी ओरडत होती. तेव्हा रेल्वेचा एक पॉइंटमन देवदूतासारखा धावून आला आणि आपल्या जीवाची पर्वा न करता काही सेकंदाच्या फरकाने या चिमुकल्याचे प्राण वाचवले. मयूर शेळके यांच्या धाडसाचा हा थरार तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

दरम्यान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करत शेळके यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. आज रेल्वेमॅन मयूर शेळके यांच्याशी संवाद साधून त्यांच्या धाडसाचं आणि त्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली. संपूर्ण रेल्वे कुटुंबाला त्यांचा अभिमान आहे. एका लहान मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात टाकला. मला रेल्वेकडून खूप काही मिळालं आहे. मी केवळ माझी जबाबदारी पार पाडली, असं त्यांनी सांगितलं, अशी माहिती पीयूष गोयल यांनी दिली. ‘त्यांच्या या शौर्याची आणि कामाची कोणत्याही पुरस्काराशी किंवा पैशाशी तुलना केली जाऊ शकत नाही. परंतु आपलं कर्तव्य पार पाडणं आणि आपल्या कामातून मानवतेबद्दल प्रेरणा दिल्याबद्दल त्यांचा नक्कीच गौरव केला जाईल.’ असं म्हणत गोयल यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button