महापौरांनी दिले लोकांचे रेशनच्या धान्याचे पैसे

औरंगाबाद : अनेकांच्या हातचे काम गेले. स्वस्तातील धान्य खरेदी करणेही काहींना शक्य होत नाही. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी इटखेड्यात शिधापत्रिकेवर धान्य खरेदी करणाऱ्यांची रक्कम स्वत: दिली आहे. याचा लाभ सव्वाचारशेवर कुटुंबांना होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोफत धान्य देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. परंतु त्याबाबतचा शासनादेश काढण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासनाकडून जुन्याच पद्धतीने आणि त्याच दराने धान्य वाटप केले जाते. परंतु शासनाने तर मोफत धान्याची घोषणा केलीय, तुम्ही पैसे का घेता, असा सवाल हे नागरिक करत होते. ही मागणी आणि प्रशासनाची अडचण लक्षात घेऊन घोडेले यांनी वाॅर्डातील नागरिकांचे धान्याचे पैसे स्वत: देण्याचा निर्णय घेतला. दुकानदाराने नियमाप्रमाणे धान्य द्यावे आणि त्याची रक्कम माझ्याकडून घ्यावी, असे त्यांनी दुकानदारांना सांगितले. त्यानुसार शनिवारी वाॅर्डातील शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य दिले आणि रक्कम घोडेले यांनी अदा केली.

प्रशासकीय गुंतागुंतीत अडकण्यापेक्षा नागरिकांना तूर्तास मोफत धान्य उपलब्ध करून देण्याचा हा सोपा मार्ग असल्याने आपण तो स्वीकारला. इतर लोकप्रतिनिधीही असे करू शकतात. कारण गरजूंना मदत करण्याची हीच वेळ असल्याचे घोडेले यांनी म्हटले आहे. मोफत धान्य मिळत असल्याचे समजल्याने वाॅर्डातील शिधापत्रिकाधारकांनी येथे गर्दी केली होती. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केला.