५० लाख रुपये देण्याच्या महापौरांच्या नुसत्या घोषणा…पुढे काय?

Kishori Pednekar

मुंबई : कोविड-१९ च्या (COVID-19) विषाणू विरुद्ध लढताना संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपये देण्याचा निर्णय केंद्राने घेतल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी पत्रकार परिषद घेऊन याची धडाकेबाज घोषणा केली. महापौरांनी ५ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन मोठी प्रसिद्धी मिळवली. परंतु, पुढे ही आर्थिक मदत मृत कोविड योद्ध्यांच्या (Covid Warriors) वारसांना मिळते का, याकडे कधीही ढुंकून पाहिले नाही. आजवर केंद्राचे जाचक नियम आणि प्रशासनाची चालढकल यामुळे कोविडमुळे मृत्यू पावलेल्या १७१ कर्मचाऱ्यांपैकी केवळ २५ कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच ही रक्कम मिळलेली आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ही मदत मिळावी म्हणून शासनाच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रशासनाला उद्भवणाऱ्या समस्या दूर कराव्यात, असे त्यांना वाटत नाही.

कोरोनाच्या महामारीत कर्तव्य बजावताना महानगरपालिकेच्या एखाद्या कर्मचा-याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला तत्काळ नोकरी देण्यात येईल. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबाला राज्य सरकारद्वारा घोषित करण्यात आलेल्या ५० लाख रुपयांच्या विम्याचा लाभ मिळेल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी ५ मे रोजीच्या पत्रकार परिषदेत दिली होती. मुळात ही योजना मार्चपासून ३० सप्टेंबर २०२० पर्यंत कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कर्मचारी, अधिकारी व कामगारांसाठी होती. परंतु कोविडचा आजार आजही कायम असून त्यानंतरही अनेक कर्मचाऱ्यांचा सेवा बजावताना मृत्यू झाला आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी माहितीच्या अधिकाराअन्वये मागितलेल्या माहितीमध्ये कोविडमुळे १७१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे. त्यातील ६४ जणांचे आर्थिक मदत मिळण्यासाठी कागदपत्रे सादर केलेली आहेत. त्यापैकी २५ जणांना सानुग्रह साहाय्य अनुदानाचा लाभ देण्यात आल्याची माहिती कामगार अधिकाऱ्यांनी दिली. जर १७१ कर्मचाऱ्यांचे मृत्यू होऊन जर आजवर २५ जणांना लाभ दिला जाणार असेल तर ही गंभीर बाब असून महापालिका आयुक्तांनी स्वत: या प्रकारणात जातीने लक्ष घालून या प्रक्रियेला गती द्यावी, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे. महापालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार केंद्र व राज्य सरकारच्या नियमानुसार काही मृत कर्मचाऱ्यांना याचा लाभ देता येत नाही. त्यांना महापालिकेच्या निधीतून ही रक्कम दिली जात आहे. जसे प्रस्ताव प्राप्त होत आहेत, त्याप्रमाणे आर्थिक मदतीसाठी पुढील प्रक्रियेसाठी अर्ज पाठवले जातात, असे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER