महापौर नंदा जिचकार यांची ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने घेतली दखल

Nanda Jichkar

नागपूर :-  ‘जगभरातील बदलते वातावरण, त्याचे परिणाम आणि उपाय’ यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध शहरांतील महापौरांचा समावेश असलेल्या ग्लोबल कोवेनट ऑफ मेयर्स (जिका) एक चळवळ सुरू केली आहे. या माध्यमातून परिणामांवर चर्चा आणि उपायांचा आराखडा तयार केला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या या चळवळीची ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने दखल घेतली आहे. जिकॉमच्या सदस्य असलेल्या नंदा जिचकार यांच्यासह अन्य सदस्यांच्या विषयाशी संबंधित मुलाखती प्रकाशित करून एका ज्वलंत विषयाला हात घातला आहे.

‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने प्रकाशित केल्यानुसार, आयपीसीसीने सन २०१८ रोजी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, सन २०४० मध्ये ग्लोबल वॉर्मिंग १.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचेल. ही भीती लक्षात घेता अनेक राष्ट्रांनी जनजागृतीसाठी पुढाकार घेतला असून ग्लोबल वार्मिंगची भयावहता टाळण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. परंतु यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. जगातील २४ देश आणि युरोपियन युनियनने एकत्र येऊन क्लिन एनर्जी उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मिशन इनोव्हेशन’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामध्ये नुकतेच ग्लोबल कोवेनंट ऑफ मेयर भागीदार झाले आहे.

ग्लोबल कोवेनंट ऑफ मेयर जगभरातील १० हजार शहरांशी जुळले असून क्लिन एनर्जी निर्माण करण्याच्या दृष्टीने संशोधन करीत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समूहाने एकत्र येऊन एखाद्या जागतिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने विशेषत्वाने नमूद केले आहे.

हे सांगतानाच ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने ग्लोबल कोवेनंट ऑफ मेयर्सचे सदस्य असलेल्या दक्षिण आशियातील एकमेव प्रतिनिधी नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांच्यासह इंडोनेशियातील सुराबया शहराच्या महापौर ट्राय रिसमहारिनी, घानातील एकारा शहराचे महापौर मोहम्मद अदजई सोव्हा, कॅनडातील एडमॉन्टन येथील महापौर डॉन इव्हेसन, केनित्राचे महापौर अझीझ रब्बाह, युरोपियन कमिशनचे उपाध्यक्ष मारोस सेफकोविक, इंग्लडचे माजी मंत्री क्रिस स्किडमोर यांच्या मुलाखती घेत त्यांच्या शहरात बदलत्या वातावरणाचे परिणाम टाळण्यासाठी काय उपाययोजना सुरू आहेत, यावर मुलाखती घेऊन प्रकाशित केल्या आहेत.

ग्लोबल वार्मिंग विषयावर जागतिक स्तरावर ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने जिकॉमच्या माध्यमातून नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांना दिलेली प्रसिद्धी ही नागपूर विकासाची ग्वाही देणारी आहे.