बाळासाहेबांच्या जयंती कार्यक्रम निमंत्रणाची जबाबदारी महापौर किशोरी पेडणेकरांकडे ; फडणवीस, राज ठाकरे नंतर पवारांची घेणार भेट

मुंबई : येत्या 23 जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची जयंती आहे. या दिवसाचे औचित्य साधत ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी दक्षिण मुंबईत पोलीस मुख्यालयसमोर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. याच सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray)यांची भेट घेतली. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही त्या स्वतः भेट घेऊन त्यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण देणार आहेत.

दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार होता. मात्र ही जागा छोटी असल्याने पुतळ्याची जागा बदलण्यात आली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार हा पुतळा आता दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी तथा निमंत्रण देण्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांची भेट घेतली. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

“शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या सूचनेनुसार सर्वांना निमंत्रण देत आहे. सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर फडणवीस, राज ठाकरे आणि आता शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं महापौर पेडणेकर म्हणाल्या. पुतळा बसवण्यात थोडा उशीर झाला. अनेक परवानग्या रखडल्या होत्या. आज बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या हातून पुतळ्याचं अनावरण होतंय हा योगायोग आहे”, असंही महापौर पेडणेकर म्हणाल्या.

गेले काही वर्ष हा पुतळा लालफितीत अडकला होता. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार सत्तेवर येताच हा पुतळा उभारण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या देण्यात आल्या आहेत. येत्या २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER