मयंक आणि ललित यांनी यशस्वी केला ‘तरंगत्या शेती’चा प्रयोग

तरंगत्या शेती

कोल्हापूर :- मयंक गुप्ता (हैदराबाद) आणि ललित झवर (मुंबई) या दोन युवकांनी हातकणंगले गावी तरंगत्या (ॲक्वॉफोनिक) शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. मयंक  गुप्ता याने ‘आयआयटी मुंबई व लान स्कूल ऑप इकॉनोमिक्स’मधून आणि ललित झवर याने आंतरराष्ट्रीय व्यापार व उद्योजकता विषयातून लंडनच्या किग्जटन विद्यापीठातून  शिक्षण घेतले आहे. दोघेही तिशीचे  आहेत.

मयंक  आणि ललितने शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने इस्त्रायल, कॅनडा, अमेरिका, चीन, हॉंगकॉंग येथील शेतीतंत्राच्या पाहणीसाठी या देशांना भेटी दिल्या. तरंगत्या शेतीच्या तंत्राची माहिती घेतली. स्वतः अशी शेती करून फक्त १५ महिन्यात लँडकाफ्ट कंपनीच्या माध्यमातून शेती क्षेत्रात हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. यापूर्वीही भारतात तसेच महाराष्ट्रात काही लोकांनी तरंगत्या शेतीचा प्रयोग केला; पण तो लहान प्रमाणात आहे.

या शेतीसाठी मयंक  आणि ललितने विविध ठिकाणांची, तिथल्या वातावरणाची, हवामानाची माहिती घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगलेची निवड केली. इथले हवामान, शेतीच्या पद्धती, शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन पाण्याची व्यवस्था तसेच सर्वांत  महत्त्वाचे म्हणजे दळणवळण याचा अभ्यास केला. कोल्हापूर येथून मुंबई, पुणे, बंगळूर, हैदराबाद, चेन्नई, सुरत शहरात एका रात्रीत पोहचता येते. कोल्हापूरपासून सांगली व सोलापूरही जवळ आहेत.

मयंक व ललितने इचलकरंजी येथील मित्राच्या मदतीने हातकणंगले येथे दोन एकर जमीन घेतली आहे. ग्रीन हाउस उभे करून आतमध्ये शेतीसाठी पाण्याचे टॅंक  बांधलेत. तीन बोअरवेलमधून पाणी फिल्टर करून या टॅंकमध्ये सोडण्यात आले. मत्स्यशेतीसाठी १३० टॅंक  बांधले आहेत. यामध्ये ३० टन मासे सध्या आहेत. माशांची विष्ठा संकलित करून ते खत शेतीला देतात. ४० प्रकारच्या भाजीपाल्यांचे  उत्पादन घेतले जाते. यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा खर्च आला असून, मयंकने आपली कंपनी विकून हा पैसा उभा केला आहे.

तंत्र
ही पाण्याचे छोटे टॅंक बांधून केली जाणारी शेती आहे. देशी व विदेशी भाजीपाला कोकोपीटमध्ये पिकवतात. ‘हायड्रोफोनिक’ व ‘अॅक्वाफोनिक’ या दोन तंत्रज्ञानामध्ये फरक आहे. हायड्रोफोनिकमध्ये रासायनिक खते व औषधांचा वापर होतो. अॅवाफोनिकमध्ये मत्स्यपालन करून माशाच्या विष्ठेचा खत म्हणून वापर करतात. मत्सपालन आधारित शेतीच्या या तंत्रातून तयार उत्पादित होणाऱ्या भाजीपाला आणि पिकांना अमेरिकेत सेंद्रिय शेती म्हणून ओळखले जाते.

परदेशात निर्यात व विविध शहरांत विक्री

भाजीपाल्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. त्या प्रमाणात उत्पादन घेण्यास मर्यादा आहेत. ललित आणि मयंकने १०० शेतकऱ्यांबरोबर १०० एकर शेतीसाठी करार केला आहे. त्यांच्या शेतीसाठी पाणी परीक्षण, माती परीक्षण करून पिकांबाबत मार्गदर्शन केले जाते. या शेतक-यांच्या शेतातून तयार होणारा भाजीपाला संकलित करून विकतात. या शेतकऱ्यांना वर्षभर एकच दर दिला जात असल्याने दर घसरले तरी हमी भाव मिळतो. बाजारपेठातील बाजारभावापेक्षा या शेतकऱ्यांना दिला जाणारा दर जास्त आहे. शेतकऱ्यांकडील भाजीपाल्याचे फॅक्टरीत पॅकिंग करतात. लॉकडाऊनपूर्वी जर्मनी, सिंगापूर येथे माल निर्यात केला जात होता. सध्या विविध ठिकाणच्या बाजारपेठा व शहरांमध्ये मागणीनुसार पाठवला जातो. स्थानिक महिलांना रोजगारात प्राधान्य देण्यात आले आहे. सुमारे १०० लोक या ठिकाणी काम करीत असून त्यांना चांगला पगार देण्यात येतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER