माऊलींचा अजानवृक्ष नेवाशातही सळसळणार…

Shailendra Paranjapeसंत ज्ञानेश्वरमाऊलींनी (Sant Dnyaneshwar Mauli) भगवद्गीता सोप्या भाषेत सांगून सातशेतीस वर्षांपूर्वी क्रांतिकारी कार्य केले. थोड्या बहुत फरकाने सर्वच संतांनी, समाजसुधारकांनी, विचारवंतांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने योगदान दिले आणि आपापल्या परीने समाजाला पुढे नेण्याचे काम केले. त्यामुळेच त्या त्या थोर संतांची सुधारकांची क्रांतिकारी नेत्यांची विचारवंतांची स्मारके उभारली जातात. त्यांच्या जयंती, पुण्यतिथीला त्यांच्या कार्याचे स्मरण केले जाते आणि त्याद्वारे आजच्या समाजाला पुढे नेण्यासाठी बळ मिळेल, हा आशावादही बाळगला जातो.

आपला समाज मूर्तीपूजक आहे आणि त्यामुळे `पीपल गेट रूलर्स दे डिझर्व्ह’ या पाश्चात्त्य विचारापेक्षा एतद्देशीय यथा राजा तथा प्रजा यावर आपला जास्ती विश्वास आहे. त्यामुळेच सामान्य जन किंवा लोक महाजनांचं आणि महाजन मंडळी अभिजनांचं म्हणजेच त्यांच्या तुलनेत उच्चभ्रू लोकांचं अनुकरण करत असतात, हे समाजजीवनात दिसून येतं. सामाजिक पातळीवर हे अभिसरण कळत-नकळत सुरूच राहतं पण सजगपणे समाजाला पुढे नेण्याचे काम करण्यासाठी थोरामोठ्यांचे अनुकरण व्हावे, यासाठी विविध प्रकारचे उपक्रम केले जातात. पुण्यामधे तर उपक्रमशीलतेला तोडच नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच पुण्यामधे विविध क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या उत्साही कार्यकर्ते संस्थांचे मोहोळच आहे. त्यातून समाजाच्या विविध क्षेत्रांशी संबंधित काम केले जाते. त्यातून काही भरीव कार्य उभे राहते तर काही वेळा असे उपक्रम म्हणजे केवळ आरंभशूरता ठरते. काही वेळा केवळ तात्कालिक ठरणारे असे उपक्रम पुढे सुरू राहिले नाही राहिले तरी त्या त्या वेळी अनेकांना प्रेरणा देऊन जातात.

बायोस्फिअर नावाच्या पुण्यातल्या संस्थेने माऊली हरित अभियान नावानं पर्यावरणस्नेही उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत संस्थेने श्री संत ज्ञानेश्वरमहाराज संस्थान श्री क्षेत्र नेवासा खुर्द यांच्यासह संयुक्तपणे संत ज्ञानेश्वरमाऊलींच्या जीवनात अनन्यसाधारण स्थान असलेल्या अजानवृक्षाच्या रोपं लावण्याचा अनोखा उपक्रम राबवला. प्रवरा नदीच्या परिसरातल्या पैस खांब मंदिर ज्याठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना केली ते स्थान तसेच नजीकच्याच अन्य काही धार्मिक ठिकाणांपाशी अशी रोपं लावली आहेत. ज्ञानेश्वरी लिहून घेतली ते सच्चिदानंदबाबा यांचे नेवासा हे स्थान आणि ते म्हाळसादेवीचेही माहेर, त्यामुळे तेथेही हे वृक्षारोपण करण्या आले. या वृक्षाच्या संदर्भानं पर्यावरणीय तसेच धार्मिक दृष्कोनातून महत्त्वाच्या माहितीचं संकलन बायोस्फीअरचे डॉ. सचिन पुणेकर यांनी केलं आहे. त्याची हरित पत्रिकाही या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांना वाटण्यात आली.

संत श्री सोपानकाकांच्या पुण्यातिथीचे औचित्त्य साधून १० जानेवारीला हा कार्यक्रम करण्यात आला. संत ज्ञानेश्वरमहाराज संस्थानचे अध्यक्ष माधवराव दरंदले यांच्यासह इतर विश्वस्तही यावेळी उपस्थित होते. पर्यावरणीय तसेच औषधीदृष्ट्याही उपयुक्त अशा या वृक्षाची माहिती सर्वदूर पसरावी, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हरित चळवळीच्या माध्यमातून माऊलींच्या संजीवन समाधीच्या शेजारचा हा अजानवृक्ष अनेक मंदिरांमधे लावण्यात आलाय पुणेकर यांच्या संस्थेने हे अजानवृक्षाचे रोप हे आळंदीयेथील सिद्धबेटातील (ज्ञानदेवांची जन्मभूमी, लीलाभूमी, कर्मभूमी) मूळ अजानवृक्षापासून तयार केले आहे.

पुण्यातल्या आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रामधे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलसंशोधक जयंत नारळीकर यांनी असाच एक प्रयत्न केला होता. न्यूटनला ज्या सफरचंदाच्या झाडावरचे फळ पडताना पाहून गतीविषयक सिद्धान्त सुचले होते त्या सफरचंदाच्या झाडाचा वंशज आयुकाच्या आवारात वाढवण्यात प्रयत्न नारळीकर यांनी केला होता. अर्तात, सफरचंदाच्या झाडाला पुण्याचे हवामान मानवले नव्हते. तसाच एक प्रयत्न भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत संपूर्ण आयुष्य संशोधनासाठी दिलेल्या डॉ रा ना दांडेकर यांनीही केला होता. त्यांनी भगवान गौतम बुद्धांना ज्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्या बोधिवृक्षाचा वंशज भांडारकर संस्थेत आणण्याचा प्रयत्न केला होता.

बोधिवृक्ष, न्यूटनच्या सफरचंदाचे झाड असो किंवा अजानवृक्ष हा प्रयत्न स्तुत्य असाच आहे. पण त्याबरोबरच या सर्व महात्म्यांनी दाखवलेल्या मार्गावरून जात जीवनाचरण केले तर समाज त्यांच्या दिशेने नक्कीच वाटचाल करू शकेल.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER