माऊचा मास्क हरवला

Divya Subhas

मालिकांच्या सेटवर कलाकारांची धमाल प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतेच. एकमेकांची खिल्ली उडवत कलाकार त्यांचा कंटाळा घालवत असतात. मुलगी झाली हो या मालिकेच्या सेटवरही नुकताच असा किस्सा घडला की नायिका माऊ म्हणेजच दिव्या सुभाषचा मास्क हरवला आणि यावरूनच दिव्याला प्रत्येकाने राउंडात घेतले. त्या दिवशी या मालिकेच्या सेटवर एकच शब्द ऐकायला मिळत होता तो म्हणजे माऊचा मास्क हरवला…तो कुणाला सापडला. सहकारी कलाकारांच्या पिडण्याने दिव्या मात्र मालिकेप्रमाणे सेटवरही मूकपणे ऐकून घेत होती.

कोरोना लॉकडाउननंतर प्रत्येकाच्याच जगण्याची पद्धत बदलली. काम करण्याची नियमावली बदलली. अनलॉकनंतर मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले तेव्हा मास्क, सॅनिटायझर या वस्तू रोज येताना सोबत घेऊन यायच्याच हे ठरले. सध्या सुरू असलेल्या मुलगी झाली हो या मालिकेच्या सेटवरही कोरोनामुळे दक्षता घेतली जाते. जेव्हा सीन शूट होणार असतो त्याचवेळी फक्त मास्क काढला जातो. मालिकेत काही ज्येष्ठ कलाकार असल्यामुळे त्यांचीही काळजी घेण्याच्या सूचना आहेत.

दोन दिवसांपूर्वी दिव्या सुभाष मालिकेच्या शूटिंगसाठी सेटवर आली. गाडीत असताना तिने काहीवेळ मास्क काढून ठेवला आणि तिचा शॉट लागेपर्यंत ती विश्रांती घेत गाडी थांबली. जेव्हा तिला सीन रेडी असल्याचं सांगण्यात आलं आणि शूटिंगसाठी ती सेटवर जायला निघाली तेव्हा मात्र तिला मास्क सापडेना. दरम्यान या मालिकेचा नायक अर्थात शौनक म्हणजेच अभिनेता योगेश सोहनीच्या लक्षात आले की दिव्या गाडीमध्ये काहीतरी शोधत आहे. तेव्हा योगेशने तिची फिरकी घेण्याचं ठरवलं. योगेश गाडी जवळ आला आणि खिडकीतून त्याला दिसलं की दिव्या बराच वेळ तिचा मास्क शोधत आहे.

तिच्या भल्यामोठ्या पर्समध्ये तो मास्क कुठे गेला हे काही तिला कळत नव्हतं. आणि गाडीतून उतरायचे आहे म्हटल्यानंतर सेटवरच्या नियमाप्रमाणे मास्क लावूनच जावे लागणार हे तर नक्की होतं. त्यामुळे दिव्यासमोर चांगलाच पेच निर्माण झाला होता एकीकडे सीन लागल्यामुळे तिला सतत बोलावणे येत होतं आणि तिचा मास्क काही केल्या तिच्या पर्समध्ये तिला सापडत नव्हता. त्यावरूनच योगेशने तिला प्रचंड छळलं. माऊचा मास्क हरवला असं म्हणत तिचा मास्क सापडे पर्यंत तिला हैराण करून करून ठेवलं. अखेर पर्स मधल्या सगळ्यात वस्तूंमध्ये हरवलेला मास्क दिव्याच्या हाती लागला आणि तिने हुश्श केले.

दिव्या आणि योगेशमध्ये सुरू असलेला हा किस्सा अर्थातच शूट करण्यात आला आणि त्यानंतर माऊचा मास्क हे प्रकरण त्यादिवशी दिवसभर मुलगी झाली हो या मालिकेच्या सेटवर मनोरंजनाचा विषय ठरले. दिव्या सुभाष आणि योगेश सोहोनी यांची केमिस्ट्री या मालिकेच्या निमित्ताने चांगलीच जुळली आहे. हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत असले तरी योगेश आणि दिव्याने यापूर्वी काही मालिकांमध्ये काम केले आहे. दिव्या यापूर्वी, प्रेमा तुझा रंग कसा आणि विठू माऊली या दोन मालिकांमध्ये दिसली होती . दिव्या सांगते की या मालिकेत ती मुकी मुलगी दाखवलेली असल्यामुळे तिला एकही संवाद नाही. यावरूनही योगेश सतत मजा करत असतो आणि म्हणत असतो की तुला पाठांतराचे काही टेन्शन नाही म्हणून तू नेहमी आमची मजा करत असतेस आता तुझा मास्क हरवल्यामुळे तुझा उडालेला गोंधळ बघून आम्हालाही मजा वाटली आणि म्हणूनच तुझी खिल्ली उडवली. या छोट्याशा किश्याने सेटवरचं वातावरण मात्र हलकाफुलकं होऊन गेलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER