कोरोनाशी संबंधीत विषय थेट सुप्रीम कोर्ट हाताळणार

Supreme Court - Maharastra Today
Supreme Court - Maharastra Today
  • हायकोर्टांमधील प्रकरणेही स्वत:कडे घेण्याचे संकेत

नवी दिल्ली : देशाच्या अनेक भागात कोरोना साथीची दुसरी लाट अधिक जोराने पसरू लागल्यानंतर ऑक्सिजनची टंचाई, औषधांचा पुरवठा आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम यासारखे वादाचे ठरू पाहणारे विषय जनहित याचिका म्हणून स्वत: हाती घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरविले असून यासंबंधी  विविध उच्च न्यायालयांमध्ये सुरु असलेली प्रकरणेही आपण आपल्याकडे वर्ग करून घेऊ असे संकेत गुरुवारी दिले.

सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. एल. नागेश्वर राव व न्या. एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने एका प्रकरणाच्या व्हिडिओ सुनावणीच्या वेळी हे सांगितले. सरन्यायाधीश म्हणाले की, आम्ही स्वत:हून हाती घेत असलेल्या (Suo-Motto PIL) या प्रकरणाची औपटचारिक नोटीस केंद्र सरकारला आज गुरुवारीच जारी केली जाईल व उद्या शुक्रवारी सुनावणी घेतली जाईल.

परस्परविरोधी आदेश दिले जाऊन गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणेही बहुधा आम्ही आमच्याकडे वर्ग करून घेऊ, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगताना सरन्यायाधीश म्हणाले: (कोरोनाशी संबंधित) काही विषयांची आम्ही स्वत:हून दखल घ्यावी, असे आम्हाला वाटते. आामच्या माहितीनुसार दिल्ली, मुंबई, सिक्किम, मध्य प्रदेश, कोलकाता आणि अलाहाबाद ही सहा उच्च न्यायालये सध्या हे विषय हाताळत आहेत. ती न्यायालये त्यांच्यापरीने योग्य ते आदेश देत आहेत, याची आम्हाला कल्पना आहे. पण यातून गोंधळ होऊ शकतो व साधनांचाही अपव्यय होतो.

सरन्यायाधीशांनी अ‍ॅक्सिजनचा पुरवठा, अत्यावश्यक औषधांचा पुरवठा, लसीकरण मोहिमेचे स्वरूप आणि पद्धत व ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्याचे राज्यांचे अधिकार या चार विषयांचा मुख्यत्वे उल्लेख केला. या चार मुद्द्यांवर राष्ट्रीय धोरण असावे यादृष्टीने आम्ही नोटीस जारी करणार आहोत.

उच्च न्यायालयांपुढे सुरु असलेल्या प्रकरणांना तुम्ही स्थगिती देणार आहात का, असे मेहता यांनी विचारल्यावर सरन्यायाधीश त्यांना म्हणाले की, काही विषय उच्च न्यायालयांकडून आमच्याकडे वर्ग करून घेण्याचा आमचा विचार आहे. खंडपीठावरील दुसरे न्यायाधीश न्या. रवींद्र भट यांनी खुलासा केला की, उच्च न्यायालयांनी दिलेले आदेश रद्द किंवा स्थगित करण्याचा आमचा सध्या तरी विचार नाही. त्यामुळे उच्च न्यायालयांमधील प्रकरणांमध्ये तुम्ही जाऊन तुमची बाजू मांडू शकता. पण सरन्यायाधीश  मेहता यांना म्हणाले की, तुम्ही जे काही सांगायचे ते येथे येऊन सांगितले तर अधिक चांगले होईल.

तर मग हे चार विषय सर्वोच्च न्यायालयाने हाती घेतले आहेत, असे मी उच्च न्यायालयांना कळवतो, असे मेहता म्हणाले. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले, ते नंतरही करता येईल. आत्ता आम्ही नोटीस काढून उद्या सुनावणी घेणार आहोत, एवढेच सांगतो आहोत.

अन्य एका प्रकरणासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील हरीष साळवे सरन्यायाधीशांना दिसले. त्यांना पाहून ते म्हणाले, साळवे येथे आहेतच. तेव्हा त्यांनी या प्रकरणात ‘अ‍ॅमायकस क्युरी’  म्हणून मदत करावी, असे आम्हाला वाटते. राजधानी दिल्ली परिक्षेत्रातील सहा ‘मॅक्स’ इस्पितळांमधील तीव्र ऑक्सिजन टंचाईचा विषय दिल्ली उच्च न्यायालयापुढे आहे. केंद्र सरकारने गरज पडल्यास कारखान्यांचा ऑक्सिजन बंद करून या इस्पितळांना पुरवावा, असे बुधवारी सांगून त्याची सुनावणी आज गुरुवारी दुपारी ठेवण्यात आली होती. नागपूर शहर आणि जिल्ह्यामधील इस्पितळांतील ऑक्सिजन व रेमडेसेविर इंजेक्शनच्या टंचाईचा विषय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे आहे. त्या खंडपीठाने बुधवारी रात्री उशिरा विशेष सुनावणी घेऊन केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या ऑक्सिजन पुरवठ्यात केलेली कपात रद्द केली होती.

मुंबई हायकोर्टाचा मात्र सुनावणी थांबविण्याचा नकार

सकाळी सर्वोच्च न्यायालयात वरीलप्रमाणे घटनाक्रम झाल्यानंतर थोड्याच वेळाने मुंबई उच्च न्यायालयात कोरोनाशी संबंधीत  विषयावरील एक जनहित याचिका मुख्य न्यायाधीस न्या. दीपंकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणीस आली. सहाय्यक सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा हवाला देत सकाळी सर्वोच्च न्यायालयात काय झाले याची माहिती दिली व या याचिकेवर सुनावणी घेण्याची विनंती केली.  सर्वोच्च न्यायालय कदाचित उच्च न्यायालयांकडील प्रकरणे स्वत:कडे वर्ग करून घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले. परंतु मुख्य न्यायाधीश न्या. दत्ता त्यांना म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आमच्यापुढील या प्रकरणाला अद्याप तरी औपचारिक स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे आम्ही सुनावणी थांबवणार नाही. महिला वकील स्नेहा मारजादे व  निलेश नवलखा यांच्या जनहित याचिका खंडपीठापुढे होत्या.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button