माथेरानची राणी लवकरच धावणार

Matherans mini train
File Image

रायगढ : संह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत असलेलं प्रसिद्ध हिल स्टेशन ‘माथेरान’ परत एकदा पर्यटकांच्या आकर्षणाचं केन्द्र ठरणार आहे. पर्यटकांना आकर्षित करणारी मिनी ट्रेन लवकरच रेल्वे रुळावर धावणार आहे. नेरळ-माथेरान रेल्वे मार्गावर अमन लॉज ते माथेरान या रेल्वेमार्गावर सध्या दुरुस्तीचं काम सुरु आहे.

मध्य रेल्वेच्या विभागीय प्रबंधकांच्या वतीनं या कामाची पाहणी करण्यात आली. माथेरान मिनी ट्रेन सेवा लवकर पूर्ववत सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

आठ महिन्यांपूर्वी काही डबे रेल्वे रुळावरून घसरल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून मिनी ट्रेनची सेवा बंद करण्यात आली होती. पण, आता दुरुस्ती कामानंतर पर्यटकांचं आकर्षण असलेली ही मिनी ट्रेन पुन्हा धावणार आहे.