गणिताचा तास अन् ‘ढोमे बाहेर जा !’

Hemant Dhome

आयुष्यातलं पहिलं क्रश हे बहुतेक वेळा शाळेतले सर किंवा टीचरच असतात हे एव्हाना सेलिब्रिटी कलाकारांनी कबूल केलेल्या पहिल्या प्रेमावरून सिद्धच झालं आहे. कोणत्याही कलाकाराला विचारा की, ते आयुष्यात पहिल्यांदा कुणावर लट्टू झाले तर त्याचं उत्तर देताना ही मंडळी शाळेतल्या वर्गात पोहचतात. मुलं असतील तर त्यांना शाळेत शिकवणाऱ्या बाई खूप आवडलेल्या असतात आणि मुलींचा जीव त्यांच्या सरांवर आलेला असतो. सेलिब्रिटी झाल्यावर मुलाखतीमध्ये पहिल्या प्रेमाविषयी बोलताना त्या प्रेमळ आठवणींची खपली निघतेच. अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) यालाही त्याच्या शाळेतल्या गणिताच्या बाई खूप आवडायच्या. हेमंतचे गणितशी कधी जमले नाही; पण गणिताच्या बाईंकडे तो टक लावून पाहात बसायचा. हेच त्या बाईंना इतकं खटकलं की, गणिताच्या तासाला बाई वर्गात आल्या की त्या आधी हेमंतकडे बघायच्या. त्याला ‘ढोमे बाहेर जा’ असं सांगायच्या आणि मगच गणित शिकवायला सुरुवात करायच्या.

हेमंत याच संदर्भातला एक किस्सा सांगताना म्हणाला की, त्यावेळी मी आठवीत होतो आणि मला आमच्या गणिताच्या बाई खूपच आवडायच्या. मला असं वाटायचं की मला या बाईंमुळेच गणित आवडू लागेल की काय ! पण बाईंनी ती संधीच दिली नाही. त्यांच्याही हे लक्षात आले की, त्या वर्गात आल्या की, मी त्यांच्याकडे टक लावून पाहात असतो. त्यांनी जे काय ओळखायचं ते ओळखलं आणि त्या वर्गात आल्या की पहिल्यांदा मला बाहेर काढायच्या आणि मग त्या गणिताचा तास घ्यायच्या. त्यामुळे झालं काय की, आठवीचं अख्खं वर्ष गणिताच्या तासाला वर्गाबाहेर जाऊनच काढलं. का कुणास ठाऊक मीही कधी एकदाही असं म्हणालो नाही की, मी नाही जाणार बाहेर. त्या बाहेर जा म्हटल्या की, मी बाहेर जायचो.

त्यांचं ते बाहेर जा म्हणणं हेदेखील मला खूप आवडायचं की काय, असं मला वाटू लागलं आहे. गणिताचा तास संपला की, मग मी वर्गात यायचो आणि कुठल्याही मित्राकडून तासाला काय काय झाले ते समजून घ्यायचो. त्यामुळे ना धड माझं गणित सुधारलं ना मी माझ्या आवडत्या बाईंचे मन जिंकू शकलो. आजही मला त्या बाई आठवतात. त्यांच्या मी किती लक्षात आहे हे मला नाही माहीत; कारण मी  कधी गणिताच्या तासाला बसलोच नाही.

शाळेची आठवण निघाली की, मला शाळेतल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा माझा आठवीतला गणिताचातास आणि त्या गणिताच्या बाई या दोन गोष्टी सगळ्यात आधी आठवतात. नाटक, सिनेमा या दोन्ही माध्यमांमध्ये स्थिरस्थावर असलेल्या हेमंतने दिग्दर्शित केलेल्या ‘बघतोस काय मुजरा कर’ या सिनेमानेही प्रेक्षकांची पसंती मिळवली. ‘सावधान शुभमंगल’ या नाटकाच्या निमित्ताने तालमी सुरू असताना त्याची भेट अभिनेत्री क्षिती जोगसोबत झाली आणि वर्षभराच्या आतच त्या दोघांचे शुभमंगल सावधान झाले. क्षणभर विश्रांतीसह अनेक सिनेमात अभिनय केलेल्या हेमंतचा प्रांत हा खरे तर लेखनाचा आहे.

त्याचे नाट्यलेखन, संवादलेखन गाजले आहे. हेमंतचे वडील पोलीस खात्यात आहेत. तो शाळा-कॉलेजमध्ये असल्यापासून लेखन करतो.  तेव्हा त्याच्या लेखनाबद्दल वडील खूप अभिमानाने सांगायचे. वडिलांच्या प्रोत्साहनामुळेच त्याने लेखन सुरू ठेवले आणि अभिनयासोबत लेखनातही प्रगती केली. दरवेळी वेगवेगळ्या विषयांमध्ये काम करायला हेमंतला आवडते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER