सुशांत सिंहच्या जीवनावर आधारित चित्रपटात झळकणार आदित्य ठाकरेंशी मिळतेजुळते पात्र

Aaditya Thackeray & Sushant Singh Rajput

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant SIngh Rajput) मृत्यूच्या चार दिवसांनंतरच त्याच्या आयुष्यावर आधारित ‘सुसाइड ऑर मर्डर’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याशी मिळतेजुळते पात्र दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यातील विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांनी सुशांत सिंह प्रकरणात अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंचे नाव घेतले आहे. सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणाशी नाव न घेता आदित्य ठाकरेंचा समावेश असल्याचे विरोधकांकडून बोलले जात आहे. त्यातच सुशांत सिंहच्या जीवनावर आधारित आदित्य ठाकरेंशी मिळतेजुळते पात्रही असणार आहे. ही भूमिका अभिनेता प्रभव उपाध्याय साकारणार असल्याचं बोललं जात आहे. यामुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढणार आहे.

दरम्यान, ‘चित्रपटाचं कथानक आणि पात्रांनुसार आम्ही कलाकारांची निवड करत आहोत. कोणत्याही पात्राला खरी नावं देण्यात येणार नाहीत आणि या राजकीय पात्राचं नावही बदलण्यात येणार आहे. तसेच, आम्ही हे कधीच म्हणणार नाही की, हे पात्र आदित्य ठाकरे यांच्यावर आधारित आहे.’ असे चित्रपट निर्माते विजय शेखर गुप्ता यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले. विजय शेखर गुप्ता यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ‘सुसाइड आणि मर्डर’ या चित्रपटाचा शुभारंभ २५ डिसेंबर रोजी नोएडातील हॉटेल ब्लू रेडिसानमध्ये करण्याचा प्लान केला आहे.

तसेच चित्रपटाचे शूटिंग ३० सप्टेंबर रोजी सुरू करणार असल्याचंही सांगितलं. या चित्रपटाचं पहिलं शेड्यूल ४० दिवसांचं असेल आणि चित्रीकरण ग्रेटर नोएडा, दिल्ली आणि मुंबईमध्ये करण्यात येणार आहे. सुशांत सिंह मृत्युप्रकरणी सीबीआय कसून तपास करत आहे. तपासादरम्यान या प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आल्यानंतर एनसीबीकडून कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. ज्या संदर्भात आदित्य ठाकरेंनी स्वतः स्पष्टीकरण देत आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचं सांगितलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER